एकदा मी व मिलिंद पाठक माहुली डोंगररांगेतील एका सुळक्याच्या रेकी करता ठाण्याहून माझ्या हीरो होंडा मोटरसायकलने निघालो. तसे आम्ही कधीच स्वतःचे वाहन घेऊन ट्रेक किंवा क्लाईंबला जात नसू, पण आसनगाव ते माहूली गाव हे ७-८ किमी चे अंतर चालायला नको व आम्ही दोघेच जण जाणार असल्यानमुळे मोटारसायकल ने जायचा प्लॅन बनवला. एक तर माहुली डोंगररांगेत पाण्याची वानवा, त्यात उन्हाळा, त्यामूळे जीव अगदी मेटाकुटीला आला. सुळक्याला जायला रस्ता असा नव्हताच. कारवीतून मार्ग कापत जाताना सर्वांगावर झाडांनी पार ओरबाडले होते. दिवसभर चढ उतार करून, बऱ्यापैकी दोर लावल्यानंतर आम्हाला सुळक्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आला. तहान व भुकेमुळे मग साधारण दुपारी ४ वाजता आम्ही माहुली गावाकडे यायला परत फीरलो. गावात मोटरसायकल ठेवली असल्याने नंतर काहीच तंगडतोड करायची नाहीये ही सुखद भावना मनात होतीच. त्यामुळे टंगळ मंगळ करत तासा-दिडतासात आम्ही माहुली गावात पोहोचलो. बघतो तर काय ??!! आमच्या बाईकचे मागचे चाक पंक्चर झाले होते
This is Abhijit Dandekar's personal blog for sharing his experiences while trekking & climbing in Sahyadri mountains since 1981. These are real life true stories and should not be reproduced or shared without author's written consent.
Friday, March 7, 2025
माहुली डोंगररांगेतील एका सुळक्याची रेकी (१९८८)
गावात तेव्हा यायला मातीचा रस्ता होता व कोणाकडेही कुठलंच वाहन नव्हतं. विचारपुस केली असता असं कळलं की सगळ्यात जवळ पंक्चरवाला येथून ६-७ किमी लांब असलेल्या शहापूर गावाजवळ आहे म्हणून. मग काय, मी व मिलिंद आम्ही दोघांनी खांद्यावरील सामानासकट व प्रचंड थकलेल्या अवस्थेत ती मोटरसायकल आलटून पालटून पकडत व ढकलत शहापूरपर्यंत आणली, जिथे हायवेजवळ जवळ एक पंक्चरवाला होता. पण आम्हाला तिथे पोहोचेपर्यंत खुप उशीर झाला होता व जास्त गिऱ्हाईकं नसल्यामूळे त्यानेही दुकान बंद करून त्याचं घर गाठलं होतं. आम्ही दोघेजण शहापूरला पोहोचेपर्यंत पुर्णपणे पिचकाटलो होतो. नशीब तो पंक्चरवाला शहापूरातच रहात असल्याने त्याच्या घरी जाऊन त्याला विनवण्या करून परत बोलावून आणण्यात आम्ही यशस्वी ठरलो. मोबाईल फोन त्याकाळी नव्हते हे वेगळं सांगायला नको.
शेवटी पंक्चर काढून रात्री १० वाजता ठाण्यात पोहोचलो एकदाचे. डबल टीबल कष्ट पडले होते, वाटलं की आसनगावहून माहुलीपर्यंत चालत आलो असतो तर बरं झालं असतं 

तळटीप - ह्या सुळक्यावर नंतर मिलिंद पाठक व राजेश गाडगीळच्या चमूने प्रथम आरोहण केले 
फोटो सौजन्यः गुगल. हा फोटो लूज बोल्डर पिनॅकलचा आहे, त्या रेकी केलेल्या सुळक्याचा नाही. कारण त्यावेळी आमच्याकडे कॅमेरा नव्हता व माझा असा अनुभव आहे की फोटो नसल्यास वा भरपूर फोटो असल्यास पोस्टची व्ह्यूअरशीप खुप कमी होते
(जनहितार्थ)
- अभिजित दांडेकर, ट्रेकींग डायरीज
Subscribe to:
Comments (Atom)