आम्ही १९८२ साली रतनगडावर जाण्यासाठी ठाणे-ईगतपुरी-भंडारदरा मार्गे शेंडी गावात मजल दरमजल करत येऊन पोचलो. त्याकाळी रतनवाडीत जायला रस्ता नसल्या कारणाने बोटीने प्रवास करावा लागायचा. विल्सन डॅमच्या जलाशयातून वल्हवणाऱ्या बोटीने जावे लागत असे. त्याचे नावाडी २-३ च होते व ते फार लहरी होते, सर्वचजण. आधीपासून सांगून सुध्दा हजर होतीलंच ह्याची काही खात्री नसायची. रतनवाडीतून परत येताना तर हमखास लटकायचीच लाईन होती व एक दिवस जादा पकडूनच जावं लागायचं कारण होडीवाला संध्याकाळी पैलतीरावर नसायचाच.
आमचा होडीवालाही गायब होता त्यादिवशी व मोबाईल फोन वगैरेची सोय नसल्यामूळे आम्हाला जलाशयाच्या काठावर बसून टाईम पास करण्याखेरीज काहीच पर्याय नव्हता. बराच वेळ वाट पाहूनही नावाडी नं आल्याने आम्ही परत शेंडी गावात आलो व रतनगडाऐवजी कळसुबाईला जाऊया असं सर्वानुमते ठरलं. बसची वाट बघत बसलो असता एक रीकामा टेंपो आला जो राजूरला जात होता. त्यामध्ये बसलेल्या एका अतिशहाण्या व्यक्तिने आम्हाला सुचवले की राजूरहून पाचनईमार्गे हरीश्चंद्रगडावर जाता येते म्हणून. कळसुबाई शिखर सर्वांचंच आधी करून झालेलं असल्यामूळे व हरीश्चंद्रगड पाहीला नसल्यामूळे आम्ही टेंपोत टपाटप सॅक्स टाकल्या व प्रस्थान केले. राजूरला उतरून पाचनईकडे चालायला सुरूवात केली. आम्हाला ह्या दोन गावांमधील अंतराची पुसटशी जरी कल्पना असती तरी आम्ही नक्कीच गेलो नसतो. गुगल मॅप्स नव्हते ना तेव्हा..!! राजूर-शिरपुंजा-आंबेत मार्गे पाचनईत पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली. बऱ्याच टेकड्या व खिंडी आम्ही ओलांडल्या होत्या. पाचनईच्या गावकऱ्यांनी आम्हाला सांगितले की वाटेत बिबट्याचा वावर असल्यामूळे रात्रीचे गडावर निघू नका व गावाबाहेरील देवळातच मुक्काम करा. मग आम्ही हरीश्चंद्रगडावर दुसऱ्या दिवशी जाण्याचा निर्णय घेतला.
तेव्हा वाटेत लागलेल्या आंबेत नावाच्या गावाबाहेर धरणाचे काम चालू होते. परवा आम्ही जवळजवळ ४० वर्षांनंतर पाचनईमध्ये गेलो, तेही गाडीने, व येताना आंबेत गावातून येत असता धरणातून पाणी सोडलेले असल्यामूळे विहंगम दृष्य दिसलं व जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मग “एक फोटो तो बनता है” म्हणून हा फोटो काढला.