१९८२ मध्ये प्रथम जेव्हा आम्ही कुलंग-मदन-अलंग ला आलो होतो त्यावेळी सह्याद्रीतील ह्या दुर्गम व बलाढ्य त्रिकुटाच्या अक्षरशः प्रेमातच पडलो होतो. १९८२ ते १९८५ मध्ये मी ५/६ वेळा तरी ईथे येऊन गेलो होतो. त्याकाळी गडावर व संपूर्ण मार्गावर आम्ही एकटेच असायचो कायम.
१९८६ च्या साधारण जानेवारी महिन्यात मिलिंद पाठकला एक खुमखुमी आली की आपण कुलंग-मदन-अलंग एका दिवसात करूया. त्यावेळी कुलंगवाडी, आंबेवाडी, घाटघर वगैरे भागात रस्तेच नव्हते, त्यामुळे आम्हाला ईगतपुरी पासूनच चालायला सुरुवात करावी लागणार होती व कुलंग-मदन-अलंग एका दिवसात करणं हे मोठं कठीण वाटत होतं. पण मिलिंद असा थोडाच सोडून देणार होता? मग एका शुक्रवारी रात्री मी, मिलिंद पाठक, बाळा राऊळ, प्रजापति बोधणे व अनिल चव्हाण, ही सर्व हॅालिडे हायकर्स क्लबची मंडळी, आसनगाव लोकलनी मुंबईहून निघालो. वाशिंद ला उतरून पुढे ट्रकच्या कॅबिनवर बसून ईगतपुरीला पोचलो. ईगतपुरी ते कुलंगवाडी गाव हे अंतर २२.५ किलोमीटर होते. बाहुली गावाजवळ धरणाचे काम चालू असल्याने तिथपर्यंत कच्चा रस्ता होता मग नंतर पायवाट होती. रात्रभर चालत फटफटायला कुलंगवाडीत पोहोचलो, पोलिस पाटलांच्या घरी चहा-बिस्कीटं खाऊन वेळ न दवडता कुलंगकडे निघालो. त्यावेळी कुलंगला जायचे ३ रस्ते (गाव ते मधलं पठार) आम्हाला माहिती होते. वरच्या पठारानंतर रस्ता एकच होता जो रीजवरून पायऱ्यांच्या मार्गाने गडावर जायचा.
१. कुलंग व छोटा कुलंगच्या मधून चढून डावीकडे जाऊन वरच्या पठारावर जायचे
२. समोर असलेल्या कुलंगच्या नाकाडावरून पायऱ्यांनी वरच्या पठारावर जायचे
३. कुलंग व मदनच्या मधल्या घळीतून उजवीकडे चढून वरच्या पठारावर जायचे
आम्ही तिसरा मार्ग निवडला कारण हा मार्ग कुलंग व मदनला जाण्यासाठी बराचसा सारखाच होता व त्यामुळे कुलंगवर आम्हाला आमची सॅक उचलून न्यायची गरज नव्हती. जेथे मदनचा फाटा फुटतो तिथेच जंगलात आम्ही आमचे सामान ठेवले व कुलंगला निघालो.
कुलंग करून परत सामानाच्या ठिकाणी आलो व अलंग-मदनच्या मधल्या घळीतून चढून दोघांच्या मध्ये असलेल्या खिंडीत पोचलो. परत आमचं सर्व सामान खिंडीत ठेवले व रोप-हार्नेस-कॅरॅबीनर/डीसेंडर, खाणे असे मोजकेच साहीत्य घेऊन मदनकडे निघालो. रॅाकपॅच चढून पायऱ्यांनी मदनवर पोहोचलो. गुहेत बसून मस्तपैकी जेवलो, थंडगार पाण्याचा आस्वाद घेतला व एक डुलकी काढली. दुपारचे २.३० वाजून गेले होते, आम्ही लगबगीने अलंगकडे निघालो. परत खिंडीत पोहचेपर्यंत दुपारचे ४ वाजले होते. ईथून नेहमीच्या मोळी मार्गाने म्हणजे घाटगर बाजूला उतरून, मधल्या पठारावरून अलंगच्या पार उजवीकडे जाऊन मोळीने (जीथे सध्या एक शीडी लावलेली आहे, त्यावेळी लाकडाची एक फांदी ठेवलेली होती) बंद असलेल्या गणपती दरवाजावर चढून परत आडवे आडवे जात अलंगवर जायला आणखीन ४ तास तरी सहज लागले असते तेही रस्ता पटापट सापडला असता तर. त्यामुळे एका दिवसात कुलंग-मदन-अलंग करायचा विचार सोडून द्यावा लागणार की काय असं वाटत होतं.
आम्ही खिंडीत “आता काय करायचं” ह्या विचारात असताना मिलिंद म्हणाला आपण डावीकडे ट्रॅव्हर्स मारून बघूया तिथून चढता येतंय का ते. नाही जमलं तर परत येऊन कुलंगवाडीत रात्री मुक्काम करूया. मग मी व मिलिंद पुढे निघालो. थोडं पुढे गेल्यावर वेलींच्या आच्छादनाखाली पायऱ्या सदृश गोष्ट दिसली व १५-२० फुटी सोपा रॅाक पॅच चढून परत ट्रॅव्हर्स मारल्यावर काही वेळाने सुरूंगाने उडवून दिलेल्या एका ६०-७० फूटी दगडी भिंतीपाशी आम्ही पोहोचलो. वरती कातळात खोदलेल्या गुहेसारखं काहीतरी दिसत होतं त्यामुळे आशेचा किरण आम्हाला दिसत होता. तोपर्यंत बाकीची मंडळीही ईथपर्यंत येऊन पोचली होती. मग मिलिंदने तो कठीण रॅाक पॅच सुंदररीत्या फ्री क्लाईंब केला व वर पोचल्यावर तो अक्षरशः ओरडलाच की पुढे कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत म्हणून. मग दोराच्या सहाय्याने आम्ही सगळे वर चढून गेलो व पायऱ्यांनी पुढे निघालो. आता आम्हाला एका नवीन रस्ता सापडला होता ज्यामुळे अंतर २ ते ३ तासांनी कमी होणार होतं व कुलंग-मदन-अलंग एका दिवसात करण्याचं स्वप्नही दृष्टीपथात आलेलं दिसत होतं. वाटेत एक पाण्याचं टाक लागलं त्यातील पाणी पिऊन आम्ही उर्वरित पायऱ्या चढून ६ वाजता अलंगच्या गुहेत पोहोचलो होतो व एका कठीण स्वप्नाची पुर्तता झाल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर जाणवत होता.
पुढे आम्ही M1 to M4 सुळके चढाई दरम्यान (१९८६-८७) हा रस्ता आणखीन चढाईयुक्त केला. त्यानंतर मी कुलंग-मदन-अलंग ला जवळजवळ १०-१२ वेळा भेट दिली असेल आणि ह्याच मार्गाने वर गेलो आहे, शेवटची खेप फेब्रुवारी २०१७.
नंतर मी ह्या नवीन शोधलेल्या अलंगच्या मार्गाबद्दल “ट्रेक द सह्याद्री” ह्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक व निष्णात गिर्यारोहक श्री. हरीष कपाडीया ह्यांना पत्र पाठवून माहिती दिली. त्यांनीही ह्या गोष्टीला पुष्टी जोडून मला उलट टपाल पाठवले होते. त्या पोस्टकार्डाचा फोटो ईथे संदर्भासाठी देत आहे.
आजकाल हा अलंगला जायचा मार्ग, जो आम्ही पहिल्यांदाच शोधून काढला होता, आंबेवाडी किंवा कुलंगवाडी बाजूने चढताना सर्रास वापरला जातो व जुना रस्ता लोप पावण्याच्या मार्गावर आहे. काळाच्या ओघात ह्या गोष्टीचे डॅाक्यूमेंटेशन राहून गेले होते म्हणून हा पोस्ट प्रपंच.
फोटो १ - वेलींच्या आच्छादनाखाली दिसलेला पायऱ्या सदृश मार्ग व १५-२० फुटी सोपा रॅाक पॅच (सौजन्यः गुगल)
फोटो २ - सुरूंगाने उडवून दिलेली ६०-७० फूटी दगडी भिंत (सौजन्यः गुगल)
फोटो ३ - श्री. हरीष कपाडीया ह्यांचे १४ एप्रिल १९८८ चे उलट टपाल