माझ्या आयुष्यातला पहिला रेंज ट्रेक : इगतपुरी - कुलंगवाडी - कुलंग - मदन - अलंग - साम्रद - रतनगड - कात्राबाई - कुमशेत - आजोबा - पाचनई - हरिश्चंद्रगड - खिरेश्वर - खुबी फाटा असा तंगडतोड ट्रेक ५ दिवसात केला होता. संपूर्ण अंतर पायी चालावे लागले होते, एक किलोमीटर अंतरासाठी सुद्धा वाहन उपलब्ध नव्हतं. म्हणजे गाडीचा रस्ताच नव्हता त्याकाळी.
कुमशेतमध्ये १९८२ साली फक्त २ किंवा ३ घरे होती व आम्ही एका शेतकऱ्याच्या घरी मुक्कामाला होतो. छोटंच कुटुंब होतं, आता नाव आठवत नाही, पण तिथेच शेती करून त्यावरच उदरनिर्वाह होता. कुमशेत हे गाव बाकी गावांपासून वा माणसांपासून एकदमच तुटलेलं होतं व तेथे कोणी फिरकतही नसे. नेहमीप्रमाणे आमची जेवणाची उत्तम सोय त्यांनी केली होती. मस्तपैकी नाचणीची भाकरी, ईंद्रायणी तांदूळाचा भात, पिठलं, कांदा व मिरचीचा ठेचा. आम्ही कात्राबाई हून हरीश्चंद्रगडाकडे निघालो होतो. पाचनईला निघण्यापूर्वी कुमशेतहून आजोबाला जाऊन यायचे होते ते करून दुपारी आम्ही परत कुमशेतला आलो. तर गरमागरम जेवण तयार होतं व आग्रह तर ईतका मनापासून की नाही म्हणायची सोयच नाही. जेवण करून आम्ही पाचनईकडे निघालो पण त्यांनी आमच्याकडून राहण्याची व जेवणाची जी उत्तम सोय केली होती त्याचा मोबदला घेण्यास मनाई केली. मग उत्तम आदरातिथ्याबद्दल आम्ही काही पैसे त्याच्या पोरांच्या हातात “खाऊसाठी” म्हणून देऊ लागलो तर तेही घेईनात. मग आम्ही परत त्याच्या वडिलांकडे पाहिले तर तो म्हणाला की ईथे ह्या कागदाच्या तुकड्यांचा काही उपयोग नाही, तुम्हालाच उपयोगी पडतील पुढे.
आमच्यातल्या एकाने तेव्हढ्यात बीडी शिलगावण्याकरता खिशातून लायटर काढला व पेटवला. तो आपोआप तयार झालेला विस्तव बघून त्या शेतकऱ्याचे डोळे लकाकले व म्हणाला की तुम्हाला काही द्यायचेच असेल तर “हे यंत्र” द्या जेणेकरून आम्हाला चूल सारखी धगधगत ठेवायला लागणार नाही व आमच्या बऱ्याच लाकूडफाट्याची बचत होईल. आम्हीही अगदी आनंदाने व मनापासून त्याला तो लायटर दिला व तेथून पाचनईकडे मार्गस्थ झालो.
आज २०२५ साली ही एक सुरसकथा वाटेल कारण कुमशेतची आता खुपच प्रगती झाली आहे व गावात बस, लाईट वगैरे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. पण एकांतात बसलो की मला ही गोष्ट राहून राहून आठवते व मनात आमच्याकाळचे ट्रेकचे दिवस, गावांची परिस्थिती, गाववाल्यांची मानसिकता, त्यातून मिळालेले अनुभव, खडतर आयुष्य व त्यावर केलेली मात ह्यांच्या सुखद आठवणी दरवळू लागतात.
No comments:
Post a Comment