Monday, February 17, 2025

देवणी सुळका चढाई मोहीम - जानेवारी १९९२

काही दिवसांपूर्वी दुपारच्या विमानानी दिल्ली ते मुंबई प्रवास झाला व विमानाच्या लॅंडीग पाथमध्ये उजवीकडे कल्याणजवळच्या श्रीमलंगगड व देवणी सुळक्याचे विहंगम दृष्य दिसले. तेव्हा माझ्या डोळ्यासमोरून आमच्या देवणी सुळका चढाईचा फ्लॅश बॅक सरकला. आम्ही चढलेल्या ५० हून अधिक सुळके व भिंतीमधील हा एकमेव असा सुळका होता ज्याने चढाई दरम्यान आम्हाला खुप आव्हाने दिली व तो सर करण्यासाठी आम्हाला तब्बल ३ प्रयत्न करावे लागले.
माझ्या मते, १९८८ च्या दरम्यान हा सुळका अरूण सावंत व चमूने प्रथम सर केला होता. अचूक तारखेची नोंद मला अजून मिळालेली नाही, त्यामुळे हा अंदाज. त्यानंतर ह्या सुळक्यावर कोणीही चढाई केली नव्हती. आम्ही १९९० साली श्रीमलंगगड व देवणी सुळका ह्यामधील खिंडीतून चढण्याचा पहील्यांदा प्रयत्न केला होता, पण आमचा अंदाज साफ चुकला. आम्हाला वाटले होते हा सुळका एका दिवसात चढून होईल पण कोल मधून चढूनसुध्दा अर्धीदेखिल चढाई संपली नव्हती. मग आम्ही चढाई अर्ध्यावरच सोडून साखळी मार्गाने श्री मलंगगडावर गेलो व तेथून चढाईमार्गाची पहाणी केली असता अशा निर्णयास पोहोचलो की चढाई मार्ग हा मागच्या बाजूनेच असावा. १९९१ मध्ये आम्ही परत ह्या सुळक्यावर चढाई साठी आलो. ह्यावेळेस आम्ही २ दिवस राखून ठेवले होते. ह्या नवीन मार्गाने म्हणजे गडाच्या विरूध्द बाजूने चढाई करताना काही काही पॅचेसनी खुप वेळ घेतला व पुन्हा एकदा ह्या सुळक्याने आमचा अंदाज पार चुकवला. माथ्यापासून साधारण १०० फूट अगोदर वेळेअभावी हा दुसरा प्रयत्नही आम्हाला सोडून द्यावा लागला.
आता आम्हीही हट्टाला पेटलो होतो. जानेवारी १९९२ मध्ये आम्ही परत येथे धडकलो पण ह्यावेळी सर्व मनुष्यबळानीशी व “कितीही दिवस लागले तरी चालतील पण माथा गाठायचाच” ह्या निर्धारानेच. आधी ह्यामार्गाने चढाई झाल्याचे आम्हाला माहीत असल्यामुळे ह्यावेळी मी अरूण सावंतला फोन करून चढाईमार्गाची ईत्यंभूत माहिती मिळवली होती व पुढील चढाई कुठून करायची ह्याचा बऱ्यापैकी अंदाज आम्हाला आला होता. चढाई करताना आम्हाला एकही वेगळा बोल्ट मारायचा नव्हता त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त नैसर्गिक चढाईचा अवलंब करत होतो. काही ठीकाणी चढाई दरम्यान व बिले स्टेशनवर पिटॅान्स व पेग्जचा वापर मात्र करण्यात आला होता.
अशाच एका बिले स्टेशनवरचा खालील फोटो, जेथे मी व राजू डींगणकर, जेमतेम पाय मावतील अशा लेजवर व फक्त २ लिटर पाण्यावर, एक अख्खा दिवस उन्हात उभे होतो. तेव्हा डीजीटल कॅमेरे किंवा मोबाईल नसल्या कारणाने ३५ मीमी फील्मरोल वापरावा लागत असे व हवे तेव्हढे फोटो काढण्याची मुभा अजिबातच नव्हती. सर्वांची परवानगी घेऊन हा एक फोटो मी काढलाच.
मागच्या वेळी आम्ही ज्या रॅाक पॅचवर बराचवेळ अडकलो होतो तो पॅच ह्यावेळी नितीन हर्डीकरने सफाईदारपणे मारला होता. त्यानंतर मी नितीनपाशी पोचलो व तेथून पुढे उरलेली चढाई पूर्ण करून संध्याकाळी ५ च्या सुमारास, जवळजवळ अडीच दिवसांच्या अथक चढाईनंतर, देवणी सुळक्याचा माथा गाठण्यात अखेरीस यशस्वी झालो. ह्या सुळक्याने आम्हाला खुप हुलकावण्या दिल्या होत्या व त्याचमूळे कदाचित माझा उर अभिमानाने जरा जास्तच भरून आला.
ही मोहीम त्यामुळेच फार लक्षात राहली आहे. खुप दिवस मी देवणी सुळका चढाईविषयी लिहीन लिहीन असं म्हणत होतो व आज तो योग आला.
फोटो १ - देवणी सुळक्याचा चढाईचा मार्ग अंदाजे मार्क केला आहे. खुप वर्ष झाल्याने डावीकडे उजवीकडे मार्कींग सरकले असण्याची शक्यता आहे. ह्यात दुसरा फोटो जीथे काढलाय त्या जागेचे अंदाजे लोकेशन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. फोटो सौजन्यः गुगल
फोटो २ - एका बिले स्टेशनवरचा हा फोटो जेथे मी व राजू डींगणकर एक अख्खा दिवस उन्हात उभे होतो.
- अभिजित दांडेकर, ट्रेकींग डायरीज




Thursday, February 6, 2025

ट्रेकदरम्यान घडलेले कन्डेंस्ड मिल्कचे नाट्य

आज काहीतरी पटकन बनवता येणारे गोड खावे म्हणून फळे चिरली व त्यात घालण्याकरता एक कन्डेंस्ड मिल्कचा टीन उघडून त्यातील तीन-चार चमचे द्रव्य वाटीत ओतून फ्रुटसॅलड बनवले. आता चमच्याला चिकटलेले जे कन्डेंस्ड मिल्क होते ते चाटून खायला चमचा तोंडात टाकला मात्र आणि मी सरळ १९८१ सालच्या आमच्या पहील्या मुक्कामी विसापूर-लोहगड ट्रेकदरम्यान जाऊन पोहोचलो.

तो आमचा पहिलाच मुक्कामी ट्रेक (११ वीत असतानाचा) असल्याने आम्ही प्लॅनिंगमध्ये अगदीच नवखे होतो. १९८१ साली वर गाड्या जायच्या नाहीत व ट्रेक मळवली रेल्वे स्थानकातूनच चालू करावा लागत असे. आम्ही मळवलीला उतरून विसापूरवर जाऊन मागील रस्त्याने विसापूर-लोहगडमधील खिंडींत उतरलो व लोहगडावर जाऊन मुक्काम केला. बरोबर चहा-साखर, खिचडी-कांदा-पापड व भांडी होतीच.
संध्याकाळ होत आल्यामूळे आधी चहा बनवावा असे सर्वानुमते ठरले. चहासाठी दुध नेण्याऐवजी, टीकण्याच्या दृष्टीने, आम्ही मिल्कमेड कंपनीचा ४०० ग्रॅम कन्डेंस्ड मिल्कचा टीन घेतला होता. ते काय प्रकरण असते ह्याची आम्हाला सुतराम सुध्दा कल्पना नव्हती. फक्त त्यात पाणी घालून त्याचे गोड दूध बनवता येते असे सांगण्यात आले होते.
त्याप्रमाणे आम्ही कन्डेंस्ड मिल्क घालून चहा केला व नंतर आवरा आवरी करताना तो कन्डेंस्ड मिल्कमधील चमचा धुण्याअगोदर चाटून पुसून साफ करायला मी तोंडात टाकला मात्र आणि अममममम…!!! माझे भारावलेले तोंड व चेहऱ्यावरचे एकंदरीत हावभाव बघून इतरांनीही त्याची चव घेतली आणि आमच्यात अक्षरशः हाणामारीच सुरू झाली 😃. काही मिनीटातच उरलेले कन्डेंस्ड मिल्क संपुष्टात आले होते. कन्डेंस्ड मिल्क घेऊन केलेला तो आमचा पहिला व शेवटचा मुक्कामी ट्रेक ठरला. त्यानंतर कायमच मिल्क पावडर व आत्ता सध्या टेट्रा पॅक वापरण्यात आलं 🤪
आज कित्येक वर्षांनी परत तोच अनुभव मिळाला म्हणून ही पोस्ट. बाकी फ्रुटसॅलडचा फोटो वगैरे उगाचच….!! 😍❤️



गोष्ट कुमशेत गावची (साल १९८२)

माझ्या आयुष्यातला पहिला रेंज ट्रेक : इगतपुरी - कुलंगवाडी - कुलंग - मदन - अलंग - साम्रद - रतनगड - कात्राबाई - कुमशेत - आजोबा - पाचनई - हरिश्चंद्रगड - खिरेश्वर - खुबी फाटा असा तंगडतोड ट्रेक ५ दिवसात केला होता. संपूर्ण अंतर पायी चालावे लागले होते, एक किलोमीटर अंतरासाठी सुद्धा वाहन उपलब्ध नव्हतं. म्हणजे गाडीचा रस्ताच नव्हता त्याकाळी.

त्या ट्रेक दरम्यान आम्ही सामरद, कुमशेत व पाचनई ह्या गावात मुक्काम केला होता. मुक्कामा दरम्यान आमची सर्वांची जेवणाची सोय गावातील मंडळीच करायचे व त्याच्या मोबदल्यात त्यांनी कधीच आमच्याकडून काही घेतले नाही.
कुमशेतमध्ये १९८२ साली फक्त २ किंवा ३ घरे होती व आम्ही एका शेतकऱ्याच्या घरी मुक्कामाला होतो. छोटंच कुटुंब होतं, आता नाव आठवत नाही, पण तिथेच शेती करून त्यावरच उदरनिर्वाह होता. कुमशेत हे गाव बाकी गावांपासून वा माणसांपासून एकदमच तुटलेलं होतं व तेथे कोणी फिरकतही नसे. नेहमीप्रमाणे आमची जेवणाची उत्तम सोय त्यांनी केली होती. मस्तपैकी नाचणीची भाकरी, ईंद्रायणी तांदूळाचा भात, पिठलं, कांदा व मिरचीचा ठेचा. आम्ही कात्राबाई हून हरीश्चंद्रगडाकडे निघालो होतो. पाचनईला निघण्यापूर्वी कुमशेतहून आजोबाला जाऊन यायचे होते ते करून दुपारी आम्ही परत कुमशेतला आलो. तर गरमागरम जेवण तयार होतं व आग्रह तर ईतका मनापासून की नाही म्हणायची सोयच नाही. जेवण करून आम्ही पाचनईकडे निघालो पण त्यांनी आमच्याकडून राहण्याची व जेवणाची जी उत्तम सोय केली होती त्याचा मोबदला घेण्यास मनाई केली. मग उत्तम आदरातिथ्याबद्दल आम्ही काही पैसे त्याच्या पोरांच्या हातात “खाऊसाठी” म्हणून देऊ लागलो तर तेही घेईनात. मग आम्ही परत त्याच्या वडिलांकडे पाहिले तर तो म्हणाला की ईथे ह्या कागदाच्या तुकड्यांचा काही उपयोग नाही, तुम्हालाच उपयोगी पडतील पुढे.
आमच्यातल्या एकाने तेव्हढ्यात बीडी शिलगावण्याकरता खिशातून लायटर काढला व पेटवला. तो आपोआप तयार झालेला विस्तव बघून त्या शेतकऱ्याचे डोळे लकाकले व म्हणाला की तुम्हाला काही द्यायचेच असेल तर “हे यंत्र” द्या जेणेकरून आम्हाला चूल सारखी धगधगत ठेवायला लागणार नाही व आमच्या बऱ्याच लाकूडफाट्याची बचत होईल. आम्हीही अगदी आनंदाने व मनापासून त्याला तो लायटर दिला व तेथून पाचनईकडे मार्गस्थ झालो.
आज २०२५ साली ही एक सुरसकथा वाटेल कारण कुमशेतची आता खुपच प्रगती झाली आहे व गावात बस, लाईट वगैरे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. पण एकांतात बसलो की मला ही गोष्ट राहून राहून आठवते व मनात आमच्याकाळचे ट्रेकचे दिवस, गावांची परिस्थिती, गाववाल्यांची मानसिकता, त्यातून मिळालेले अनुभव, खडतर आयुष्य व त्यावर केलेली मात ह्यांच्या सुखद आठवणी दरवळू लागतात.
आपल्यातल्या किती जणांना हा अनुभव आला आहे बरे? कृपया कॅामेंटमध्ये जरूर लिहा. आत्ताच्या व्यावसायिक जगात हा अनुभव पुन्हा मिळणे नाही 😞



हा खेळ “काठ्यांवर चालण्याचा” - एक गंमतशीर अनुभव



काळ - ८० च्या दशकातील, स्थळ - कुलंगवाडी

पावसाळ्यात ट्रेकला जायची आमची दोन हमखास आवडीची ठिकाणे म्हणजे भीमाशंकर व कुलंग. तेव्हा कुलंगवाडी, कुलंगच्या पायथ्याचे गाव, हे बाह्य व्यावसायिक जगापासून खुपच दूर होतं, कारण ईथे यायला रस्ताच नव्हता मुळी. सर्वात जवळची गावं म्हणजे काळुस्ते किंवा बाहुली, जेथे जायला ३ तास चालत जावं लागत असे !!
कुलंगवाडीत प्रचंड पाऊस पडायचा. गाव बऱ्यापैकी सपाटीवर असल्याने पाण्याचा निचरा झटपट होत नसे, त्यामुळे गावात खुप चिखल व्हायचा. गावातून बुट घालून किंवा तसेच चालत जायचे म्हणजे महा कर्मकठीण काम होतं. पाय पूर्ण बरबटायचे, मग पुढे ओढ्यावर जाऊन अर्धातास साफसफाई करत बसावी लागायची.
पण गावातल्या लोकांनी ह्यावर एक जबरदस्त उपाय शोधून काढला होता. ते आफ्रिकेतील लोकांप्रमाणे दोन उंचच उंच काठ्यांवर उभे राहून चालायचे. लहान लहान पोरं पण लिलया त्या उंच काठ्यांचा वापर करून गावभर बागडत असत. त्यामूळे दोन फायदे व्हायचे, एक म्हणजे चिखलापासून सुटका व दुसरं असं की लांबच लांब ढांगा टाकत चालता येत असल्यामुळे दूरची अंतरं फटाफट कापता यायची.
एकदा आम्ही आपापसात म्हणालो की आपणंही असंच काठ्यांवरून चालत कुलंगवाडीच्या बाहेरपर्यंत जाऊया जेणेकरून आपला खुप वेळ वाचेल. लहान पोरंसुध्या इतकं आरामात हे करत होती की ते अतिशय सोप्पं वाटत होतं. मग आम्ही गावातल्या पोरांकडून काठ्या उसन्या घेऊन त्यावर उभं राहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कळलं की हे काम दिसतंय तेव्हढं सोप्पं अजिबातच नाहीये. त्या काठ्यांवर उभं राहण्याच्या नादात, आम्ही जवळजवळ सर्वच जण, तोल जाऊन खाली चिखलात इतकेवेळा पडलो की काही विचारू नका. आधी फक्त पायच बरबटायचे पण आता संपूर्ण अंग व कपडे बरबटलेले होते. साधारण अर्धा पाऊण तास बरबटल्यानंतर आम्ही काठ्यांवरून चालायचा अट्टाहास सोडून दिला व कुंलंगकडे मार्गस्थ झालो.
सह्याद्रीच्या गावांमध्ये कोणा कोणाला असा अनुभव आला आहे? मी तरी कुलंगवाडी व खांडस सोडून ईतर गावात कोणाला असे काठ्यांवरून चालताना बघितलेले नाही. कॅामेंटमध्ये जरूर सांगा.




- अभिजित दांडेकर
फोटो सौजन्यः गुगल

कुलंग-मदन-अलंग एका दिवसात (१९८६) - अलंगच्या नवीन मार्गाचा शोध व प्रथम चढाई

१९८२ मध्ये प्रथम जेव्हा आम्ही कुलंग-मदन-अलंग ला आलो होतो त्यावेळी सह्याद्रीतील ह्या दुर्गम व बलाढ्य त्रिकुटाच्या अक्षरशः प्रेमातच पडलो होतो. १९८२ ते १९८५ मध्ये मी ५/६ वेळा तरी ईथे येऊन गेलो होतो. त्याकाळी गडावर व संपूर्ण मार्गावर आम्ही एकटेच असायचो कायम.

१९८६ च्या साधारण जानेवारी महिन्यात मिलिंद पाठकला एक खुमखुमी आली की आपण कुलंग-मदन-अलंग एका दिवसात करूया. त्यावेळी कुलंगवाडी, आंबेवाडी, घाटघर वगैरे भागात रस्तेच नव्हते, त्यामुळे आम्हाला ईगतपुरी पासूनच चालायला सुरुवात करावी लागणार होती व कुलंग-मदन-अलंग एका दिवसात करणं हे मोठं कठीण वाटत होतं.
पण मिलिंद असा थोडाच सोडून देणार होता? मग एका शुक्रवारी रात्री मी, मिलिंद पाठक, बाळा राऊळ, प्रजापति बोधणे व अनिल चव्हाण, ही सर्व हॅालिडे हायकर्स क्लबची मंडळी, आसनगाव लोकलनी मुंबईहून निघालो. वाशिंद ला उतरून पुढे ट्रकच्या कॅबिनवर बसून ईगतपुरीला पोचलो. ईगतपुरी ते कुलंगवाडी गाव हे अंतर २२.५ किलोमीटर होते. बाहुली गावाजवळ धरणाचे काम चालू असल्याने तिथपर्यंत कच्चा रस्ता होता मग नंतर पायवाट होती. रात्रभर चालत फटफटायला कुलंगवाडीत पोहोचलो, पोलिस पाटलांच्या घरी चहा-बिस्कीटं खाऊन वेळ न दवडता कुलंगकडे निघालो. त्यावेळी कुलंगला जायचे ३ रस्ते (गाव ते मधलं पठार) आम्हाला माहिती होते. वरच्या पठारानंतर रस्ता एकच होता जो रीजवरून पायऱ्यांच्या मार्गाने गडावर जायचा.
१. कुलंग व छोटा कुलंगच्या मधून चढून डावीकडे जाऊन वरच्या पठारावर जायचे
२. समोर असलेल्या कुलंगच्या नाकाडावरून पायऱ्यांनी वरच्या पठारावर जायचे
३. कुलंग व मदनच्या मधल्या घळीतून उजवीकडे चढून वरच्या पठारावर जायचे
आम्ही तिसरा मार्ग निवडला कारण हा मार्ग कुलंग व मदनला जाण्यासाठी बराचसा सारखाच होता व त्यामुळे कुलंगवर आम्हाला आमची सॅक उचलून न्यायची गरज नव्हती. जेथे मदनचा फाटा फुटतो तिथेच जंगलात आम्ही आमचे सामान ठेवले व कुलंगला निघालो.
कुलंग करून परत सामानाच्या ठिकाणी आलो व अलंग-मदनच्या मधल्या घळीतून चढून दोघांच्या मध्ये असलेल्या खिंडीत पोचलो. परत आमचं सर्व सामान खिंडीत ठेवले व रोप-हार्नेस-कॅरॅबीनर/डीसेंडर, खाणे असे मोजकेच साहीत्य घेऊन मदनकडे निघालो. रॅाकपॅच चढून पायऱ्यांनी मदनवर पोहोचलो. गुहेत बसून मस्तपैकी जेवलो, थंडगार पाण्याचा आस्वाद घेतला व एक डुलकी काढली. दुपारचे २.३० वाजून गेले होते, आम्ही लगबगीने अलंगकडे निघालो. परत खिंडीत पोहचेपर्यंत दुपारचे ४ वाजले होते. ईथून नेहमीच्या मोळी मार्गाने म्हणजे घाटगर बाजूला उतरून, मधल्या पठारावरून अलंगच्या पार उजवीकडे जाऊन मोळीने (जीथे सध्या एक शीडी लावलेली आहे, त्यावेळी लाकडाची एक फांदी ठेवलेली होती) बंद असलेल्या गणपती दरवाजावर चढून परत आडवे आडवे जात अलंगवर जायला आणखीन ४ तास तरी सहज लागले असते तेही रस्ता पटापट सापडला असता तर. त्यामुळे एका दिवसात कुलंग-मदन-अलंग करायचा विचार सोडून द्यावा लागणार की काय असं वाटत होतं.
आम्ही खिंडीत “आता काय करायचं” ह्या विचारात असताना मिलिंद म्हणाला आपण डावीकडे ट्रॅव्हर्स मारून बघूया तिथून चढता येतंय का ते. नाही जमलं तर परत येऊन कुलंगवाडीत रात्री मुक्काम करूया. मग मी व मिलिंद पुढे निघालो. थोडं पुढे गेल्यावर वेलींच्या आच्छादनाखाली पायऱ्या सदृश गोष्ट दिसली व १५-२० फुटी सोपा रॅाक पॅच चढून परत ट्रॅव्हर्स मारल्यावर काही वेळाने सुरूंगाने उडवून दिलेल्या एका ६०-७० फूटी दगडी भिंतीपाशी आम्ही पोहोचलो. वरती कातळात खोदलेल्या गुहेसारखं काहीतरी दिसत होतं त्यामुळे आशेचा किरण आम्हाला दिसत होता. तोपर्यंत बाकीची मंडळीही ईथपर्यंत येऊन पोचली होती. मग मिलिंदने तो कठीण रॅाक पॅच सुंदररीत्या फ्री क्लाईंब केला व वर पोचल्यावर तो अक्षरशः ओरडलाच की पुढे कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत म्हणून. मग दोराच्या सहाय्याने आम्ही सगळे वर चढून गेलो व पायऱ्यांनी पुढे निघालो. आता आम्हाला एका नवीन रस्ता सापडला होता ज्यामुळे अंतर २ ते ३ तासांनी कमी होणार होतं व कुलंग-मदन-अलंग एका दिवसात करण्याचं स्वप्नही दृष्टीपथात आलेलं दिसत होतं. वाटेत एक पाण्याचं टाक लागलं त्यातील पाणी पिऊन आम्ही उर्वरित पायऱ्या चढून ६ वाजता अलंगच्या गुहेत पोहोचलो होतो व एका कठीण स्वप्नाची पुर्तता झाल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर जाणवत होता.
पुढे आम्ही M1 to M4 सुळके चढाई दरम्यान (१९८६-८७) हा रस्ता आणखीन चढाईयुक्त केला. त्यानंतर मी कुलंग-मदन-अलंग ला जवळजवळ १०-१२ वेळा भेट दिली असेल आणि ह्याच मार्गाने वर गेलो आहे, शेवटची खेप फेब्रुवारी २०१७.
नंतर मी ह्या नवीन शोधलेल्या अलंगच्या मार्गाबद्दल “ट्रेक द सह्याद्री” ह्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक व निष्णात गिर्यारोहक श्री. हरीष कपाडीया ह्यांना पत्र पाठवून माहिती दिली. त्यांनीही ह्या गोष्टीला पुष्टी जोडून मला उलट टपाल पाठवले होते. त्या पोस्टकार्डाचा फोटो ईथे संदर्भासाठी देत आहे.
आजकाल हा अलंगला जायचा मार्ग, जो आम्ही पहिल्यांदाच शोधून काढला होता, आंबेवाडी किंवा कुलंगवाडी बाजूने चढताना सर्रास वापरला जातो व जुना रस्ता लोप पावण्याच्या मार्गावर आहे. काळाच्या ओघात ह्या गोष्टीचे डॅाक्यूमेंटेशन राहून गेले होते म्हणून हा पोस्ट प्रपंच.
फोटो १ - वेलींच्या आच्छादनाखाली दिसलेला पायऱ्या सदृश मार्ग व १५-२० फुटी सोपा रॅाक पॅच (सौजन्यः गुगल)
फोटो २ - सुरूंगाने उडवून दिलेली ६०-७० फूटी दगडी भिंत (सौजन्यः गुगल)
फोटो ३ - श्री. हरीष कपाडीया ह्यांचे १४ एप्रिल १९८८ चे उलट टपाल




- अभिजित दांडेकर