आम्ही नोव्हेंबर १९८७ ला जेव्हा प्रथम काट्याची लिंगी सर केली होती, तेंव्हाच आम्हाला ह्या नाणेघाटाच्या पठाराच्या खाली पण बऱ्याच वरच्या अंगाला असलेल्या २०० फुटी उंचीच्या “पळूच्या लिंगीचे” दर्शन घडले होते. पण तो सुळका इतक्या उंचावर होता की खालील पळू गावातून त्याच्या पायथ्याला जायचे म्हटले तर तिथे पोहोचेपर्यंतच बरंच प्रस्तरारोहण करावे लागलं असतं. म्हणजे “चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला” 😜. दुसरा मार्ग म्हणजे नाणेघाटाच्या पठारावरून ह्या लिंगीच्या व नाणेघाटाच्या डोंगरामधील खिंडीत दोराच्या साहाय्याने उतरायचे आणि मग ह्या सुळक्यावर आरोहण करायचे. पण त्याकरता साधारणपणे ४०० फूट लांबीच्या दोरीची आवश्यकता होती आणि त्या काळी ४०० फूट लांबीचा अखंड दोर आमच्याकडे नव्हताच. त्यामुळे ही चढाई लांबणीवर पडत चालली होती. शेवटी ठाण्याच्या समिट माऊंटेनिअर्सच्या सौजन्याने एक नवीन कोरा करकरीत असा ८ मिमी जाडीचा नायलॉनचा दोर (तोडी कंपनीचा) उपलब्ध झाला आणि २६ जानेवारी १९९१ ला लगेचच ही मोहीम हाती घेण्याचे ठरले.
त्यानुसार मी, अभय पावगी, उदय रेमजे, राजू डिंगणकर, आनंद कुलकर्णी (अंत्या), राजू रेळे (कुल्फी), वरुण नामजोशी (मन्या) व मिलिंद परांजपे (पोंग्या) २५ जानेवारीला रात्रीच नाणेघाटाच्या गुहेत मुक्कामाला पोचलो (त्याकाळी, ह्या गुहांना आत्तासारखी “झाकणं” नव्हती, व आत मुक्काम करता येत असे). पहाटे, पोहे व चहा करून लगेचच पठारावरील "टोक" सुळक्याच्या खाली असलेल्या एका चांगल्याश्या जागेवर जाऊन धडकलो. थोडं वर-खाली, डावीकडे-उजवीकडे केल्यावर कुठून उतरायला सुरुवात करता येईल त्याचा अंदाज बांधून एका छानश्या झाडाला दोर बांधून खाली उतरण्याच्या तयारीला लागलो. सुळका आम्हाला वरून दिसत नसल्यामुळे, सर्वांचे अंदाज बांधणे चालू होते. १००-१५० फूट खाली उतरल्यावर अंदाज येईल म्हणून मी प्रथम उतरायला सुरुवात केली. २०० फूट साधारण उतरल्यानंतर मला समजले कि सुळका माझ्या बराच डावीकडे राहिला आहे. परत वर चढून नवीन ठिकाणी रोप बांधून खाली उतरण्यात वेळ गेला असता, म्हणून मी तसंच आडवं आडवं जायला सुरवात केली. साधारणपणे खिंडीच्या वर आलोय असं वाटल्यावर, तिथे भिंतीत एक खिळा (पेग) ठोकला, आणि सरळ खाली खिंडीत पोहोचून, सर्वांना एका मागोमाग एक तिथे चढाईचे साहित्य घेऊन यायला सांगितले. त्याकाळी मोबाईल तर सोडाच पण साधी वॉकी-टॅाकीही आमच्याजवळ नसल्यामुळे, आरडा-ओरडा करूनच संवाद साधायला लागत असे. त्यात वाऱ्यामूळे आवाज वर पर्यंत पोहोचेलच ह्याची खात्री नसायची.
माझ्यानंतर अंत्या थोड साहीत्य घेऊन खाली उतरून आला आणि येताना पेगला “फिगर ऑफ ऐट” ची गाठ मारून तो खाली आला होता आणि हे वरच्यांना माहिती नव्हतं. नंतर पोंग्यानी रॅपलिंग (दोराच्या साहाय्याने उतरणे) करायला सुरुवात केली, पण मध्ये दोर बांधला असल्याचे माहित नसल्याने तो सरळ त्या पेगपर्यंत जोरात येऊन आदळला. दोर, त्याच्या नाममात्र वजनामूळे का होईना, पण ताणला गेल्यामूळे तो तिथे पूर्ण पणे लॉक झाला. प्रचंड जीवाचा आकांत व धडपड करून त्याने कशी-बशी स्वतःची सुटका करून घेतली, व ह्या नादात त्याच्या नाकाला दोर घासून जी जखम झाली होती ती आम्हाला अनाकलनीय व प्रचंड हास्यास्पद अशी होती. ती, आम्ही त्याला पुढचा महीनाभर हसायला व त्याचं टोपणनाव सार्थ ठरायला पुरेशी होती.
नंतर मी चढाई सुरु केली. आमच्याकडे २०० फूट रोप, काही पिटॉन्स (दगडात माराचे एक विशिष्ट प्रकारचे खिळे) व २-३ एक्सपांशन बोल्ट्स होते. एक्सपांशन बोल्ट दगडात मारण्याआधी ड्रिलबीट व हातोडीने दगडात एक भोक पाडावे लागत असे. त्यानंतर त्याच्या मागच्या भागात दिलेल्या भेगेमध्ये एक त्रिकोणी आकाराची पाचर बसवून तो खिळा आत मारला कि तो दगडामध्ये घट्ट बसतो. तो खिळा मग तिथेच सोडून द्यावा लागत असे. त्याच्या ह्या विशिष्ट रचनेमूळे, ती त्रिकोणी पाचर अतिशय महत्वाची असते. मी वर चढाई करत असताना अभय म्हणाला "अरे, आपल्याकडे बोल्ट्स तर २-३ आहेत, पण पाचर एकच आहे". हा एक आमच्यासाठी एक धक्काच होता कारण आम्हाला आता एका पेक्षा जास्त बोल्ट वापरता येणार नव्हता. चढाईच्या शेवटच्या टप्प्यात एक कातळ असल्यामुळे, बराच प्रयत्न करूनही, बोल्ट मारण्याशिवाय काहीच पर्याय उरला नाही आमच्या पुढे. परत बोल्ट हाताळण्यामुळे होणाऱ्या चुकांमुळे, आम्हाला रिस्क घ्यायची नव्हती, त्यामुळे मी अभयला माझ्यापाशी बोलावले व पुढे जाऊन बोल्ट मारण्यास सांगितले. पाचर एकच असल्यामुळे “जीवापेक्षाही जास्त काळजी घ्यायला” सांगितली तिची. अभयनी बोल्ट करता दगडात छिद्र बनवले, व बोल्ट निवडून त्यात पाचर टाकून हातोडीने ठोकण्यास सुरुवात केली मात्र, आणि हातोडीचा फटका चुकला व बोल्ट त्या पाचरसहित हवेत उडाला. बोल्ट दोरीला बांधला असल्यामुळे कुठे जाणार नव्हता, पण एकमेव पाचर हवेत उडाल्यामुळे आम्हाला ही चढाई अर्धवटच सोडून द्यावी लागणार होती. माझ्या तोंडाचा "आ" करून मी हताशपणे अभयकडे मान वर करून बघत होतो तोच अभय म्हणाला कि "वाट लागली, पाचर उडाली बहुतेक, आत दिसत नाहीये ह्यामध्ये". मी काही बोलणार तेव्हढ्यात ती हवेत उंच उडालेली पाचर सरळ माझ्या "आ-वासलेल्या" तोंडातून जिभेवर येऊन विसावली. मी काहीही न बोलता व क्षणाचाही विलंब न करता ती पाचर अभयला दिली व सांगितलं की चढाई चालू ठेव. नंतर चढाई यशस्वीरीत्या पूर्ण करून आम्ही दुपारीच पळूच्या लिंगीचा माथा गाठला होता व आणखीन एका अजिंक्य सुळक्यावर चढाई पूर्ण केली होती.
अभयला शेवट पर्यंत नं उलगडलेले कोडं होतं कि माझ्याकडे दुसरी पाचर आली कुठून? त्याने मला खूप वेळा हा प्रश्न विचारला, पण मी त्याला आज पर्यंत सांगत आलो होतो कि "मला झाली......!!" 🤣
नशीब ती पाचर माझ्या जीभेवर येऊन विसावली, “आत गीळली असतीस तर?” उदयने प्रश्न विचारला. त्यावर मी हसतंच म्हणालो “मग त्यात काय प्रॅाबलेम? जास्तीत जास्त उद्या सकाळ पर्यंत थांबावं लागलं असतं व समीट उद्या झालं असतं” 🤣🤣
- अभिजित दांडेकर (फोटो साहाय्य : राहुल खोत)
No comments:
Post a Comment