पहिल्यांदा १९८२ साली कुलंग, मदन व अलंग (AMK) ट्रेक केल्यानंतर सह्याद्रीतील ह्या अफलातून त्रिकुटाच्या आम्ही अक्षरशः प्रेमात पडलो होतो. त्यावेळी सह्याद्रीच्या ह्या डोंगररांगांमध्ये कोणीच फिरकत नसे, त्याला दोन कारणं होती, एक म्हणजे इथे यायचा अप्रोच खूपच लांबचा होता व दुसरं म्हणजे ह्या दुर्गम किल्ल्यांवर पोहोचण्यासाठी प्रस्तरारोहणाचा वापर करावा लागत असे. त्यानंतर AMK ला आम्ही ७ ते ८ वेळा आलो असू व वेगवेगळ्या मार्गानी चढाया केल्या होत्या त्यामुळे ह्या डोंगररांगांची खडान् खडा माहिती झाली होती. त्यात काही नवीन मार्ग शोधण्याच्या आम्ही मागेही लागलो होतो. तेंव्हा इथे फिरताना कुलंग व मदनच्या मधील दोन सुळके त्याचप्रमाणे अलंगच्या पलीकडील दोन सुळके आम्हाला कधीपासून खुणावत होते. मार्च १९८६ ला अजिंक्य व सह्याद्रीतील आत्तापर्यंतचा सर्वात ऊंच सुळका "बाण" सर केल्यानंतर आम्हाला काही नवीन सुळके करण्याची खुमखुमी आलीच होती. त्यात आमच्या कॉलेजच्या मित्रांचा ग्रुप होता व बरेच ट्रेक्स आम्ही एकत्र केले होते, त्या सर्वांना एखादा सुळका चढण्याची मनापासून इच्छा होती. मग आमचे तत्कालीन गुरु व स्नेही मिलिंद पाठक ह्यांच्या डोक्यात कुलंग व मदन च्या मधील दोन सुळक्यांपैकी डावीकडचा (जो थोडा उंचीला कमी आहे) सुळका करण्याचा विचार आला. ह्या सुळक्यांची पहाणी करायलाही वेळ मिळाला नव्हता. त्याच्या बेस पर्यंत जायला रस्ता आहे का, तिथे राहायला जागा कशी आहे किंवा पाण्याचा साठा जवळपास कुठे असेल, चढाईला अंदाजे किती वेळ लागेल आणि काय काय साहित्य पाहिजे हे प्रश्न अनुत्तरीत होते. पण मिलिंद म्हणाला "भिडेंगे", तर भिडेंगे. काही नाही तर AMK चा आणखीन एक ट्रेक तर होईल व आम्हाला अलंगचा आणखीन एक नवीन रूट शोधायचं डोक्यात होतंच ते कृत्य तरी पूर्ण करता येईल, अश्या विचाराने हाताशी असलेले साहित्य म्हणजे ३०० फूट रोप, ५-६ स्नॅपलिंक्स (अल्यूमिनीयम अलॉयच्या कड्या), १ सीट हार्नेस (सुरक्षिततेकरता कमरेला बांधायची पट्टी), ३-४ पिटॉन्स (दगडांच्या भेगांमध्ये सुरक्षिततेकरता मारायचे लोखंडी खिळे) व १ रींग एक्सपान्शन बोल्ट (प्रसरण पावणारा दगडात ठोकायचा कायमस्वरूपी खिळा), एव्हढे साहीत्य घेऊन आम्ही सर्वजण ठाण्याहून निघालो.
२१ डिसेंबर १९८६ ला मध्यरात्री भुसावळ पॅसेंजर ने आम्ही ९ जण (ह्यातले ६ जणांची पहिलीच सुळका चढाई मोहीम, तीही एका अजिंक्य सुळक्यावर), ठाण्याहून निघून पहाटे ३.३० वाजता इगतपुरी स्थानकात उतरलो. बाहेरच गरम गरम बटाटेवडा व चहा पिऊन आम्ही कुलंगवाडीकडे चालत सर्व सामनानिशी प्रस्थान केले. त्यावेळी कुलंगवाडीला जायला कुठलेही वाहन नव्हते किंबहुना रस्ताच नव्हता तिथे जायला. इगतपुरी - बाहुली मार्गे २२.५ किमी चालत जावे लागत असे. साधारणतः ४ तास लागायचे कुलंगवाडीत पाहोचायला. २२ डिसेंबरला सकाळी ९ वाजता कुलंगवाडीहून मदन व अलंगच्या मध्ये असलेल्या खिंडीमध्ये पोहोचण्यासाठी चढाईला सुरुवात केली. ११ ला त्या खिंडीत पोहोचलो. इथपर्यंत रस्ता माहिती होता पण आता पुढे सगळं शोधायचं होतं. खिंडीमध्ये मदन गडाकडे तोंड करून उभं राहिलं असता, मदनच्या डाव्या बाजूने ट्रॅव्हर्स (एकाच उंचीवरून आडवं जाणे) घ्यायचं ठरलं. ह्या रस्तावरून पहिल्यांदाच कोणीतरी जाणार होतं. मदनगड ओलांडून आम्ही मदन व त्याला लागून असलेल्या पहिल्या सुळक्याच्या (M2) जवळ आम्ही अर्ध्या तासात पोहोचलो व नंतर पुढील काही मिनिटातच पहिल्या (M2) व दुसऱ्या (M1 मदनबाण) सुळक्याच्या मध्ये आलो. आम्हाला M1 किंवा मदनबाण हा ३०० फुटी अजिंक्य सुळका चढायचा प्रयत्न करायचा होता. थोडावेळ स्थिरस्थावर झाल्यावर थोडं खाऊन घेतलं (घरून डबा आणला होता, नवीन पोरं होती ना बरोबर), चढाईचं साहित्य बाहेर काढलं व चढाईचा मार्ग निश्चित केला. मिलिंद चढाई करत होता, काही वेळातच तो दोन्ही सुळक्याच्या मधल्या क्रॅक मधून त्यांच्या मधल्या खिंडी मध्ये पोहोचला. नंतर रोप लावल्यावर आम्ही सर्वजण खिंडीमध्ये पोहोचलो. मग वरच्या चढाईला सुरुवात झाली. त्यानंतर मिलिंदने तासाभरात माथा गाठला मग रोप लावल्यावर पाठोपाठ सर्व जण अजिंक्य सुळक्याच्या माथ्यावर पोहोचले. ६ जणांची पहिल्यादाच सुळका चढायची वेळ, आणि ती ही एका अजिंक्य सुळक्यावर...!! सर्वांनी एकमेकांचं अभिनंदन केलं व खालती उतरायला सुरुवात केली. मिलिंदने सुरक्षिततेकरता एक रींग बोल्ट मारला आणि सगळ्यांनी रॅपलिंग (दोराच्या साहाय्याने खाली उतरणे) करायला सुरुवात केली. साधारण पणे ४ वाजता बेसला उतरलो.
आता पुढचे प्रश्न सोडवायचे होते. राहायची व पाण्याची जागा जवळपास कुठेही नव्हती मग आम्ही मागच्याच महिन्यात शोधलेल्या नवीन मार्गानी अलंगवर मुक्कामाला जाण्याचा निर्णय घेतला. हा रस्ता अलंग-मदनच्या खिंडीमध्ये अलंग गडाकडे तोंड करून उभं राहिलं असता, डाव्या बाजूनी जातो. हा नवीन रस्ता आम्हीच पहिल्यांदा शोधून काढला होता पण त्यामध्ये ७० फुटाची भिंत चढायला लागणार होती. जुन्या दगडी पायऱ्या ब्रिटिशांनी सुरुंग लावून उडवून दिल्यामुळे हि दगडी भिंत प्रस्तरारोहणकरून चढायला लागणार होती. ह्या नवीन मार्गाच्या शोध मोहिमेबद्दल मी वेगळी पोस्ट करणार आहे. सध्या हा मार्ग नेहमीचा प्रचलित मार्ग झाला आहे त्याचप्रमाणे स्व. अरुण सावंतनी आम्ही केलेल्या सुळक्याच्या इथूनच पुढे कुलंगला जाणारी नवीन वाट शोधल्यानंतर हा मार्गही आता प्रचलित झाला आहे. असो, मिलिंदनी ह्या भिंतीवर प्रस्तरारोहण करून (एकही खिळा न मारता) वर रोप फिक्स केला. सर्वजण "मावळा" पद्धतीने (दोर पकडून पाय दगडाला टेकत स्वत:ला वर खेचत चढणे) फटाफट वर चढून गेले. त्यानंतर गडाच्या वरच्या पायऱ्या लागतात व वाटेमध्ये एक पाण्याचे टाके आहे तिथे थांबून पोटभर पाणी पिऊन आम्ही संध्याकाळी अलंगच्या गुहेमध्ये मुक्कामासाठी पोहोचलो.
२३ डिसेंबरला आम्ही अलंगवरच मुक्काम करायचा निर्णय घेतला आणि अलंग किल्ला सर्व काना-कोपऱ्यात जाऊन नीट बघितला. त्या रात्री "बडा खाना" करायचा होता, त्यानुसार पंचरंगी पुलाव, कांदा बटाटा टोमॅटो रस्सा आणि शिरा करायच्या तयारीला दुपारपासूनच लागलो. संध्याकाळी खुपच गार वारा सुटला होता व चांगलीच बोचरी थंडी पडायला लागली होती. मग आम्ही शेकोटीपाशी छान गाणी म्हणत ह्या अमृततुल्य जेवणावर ताव मारला व काही वेळातच सर्व भांडी धुवायलाही लागणार नाहीत एव्हढी स्वच्छ झाली. सगळेजण सोलापुरी चादरी पांघरून कुडकुडत झोपी गेले. २४ डिसेंबरला सकाळी उतरून परत कुलंगवाडी गाठलं, नंतर चालत ईगतपुरी, तिथून शेअर जीपनी कसारा, मग लोकल ट्रेननी रात्रीपर्यंत ठाण्यात परत आलो.
कुलंगवाडीला निघायच्या अगोदर आम्ही सध्या कोणाला विश्वास बसणार नाही अशी गोष्ट केली. आम्हाला परत एक-दोन आठवड्यांनी दुसऱ्या अजिंक्य सुळक्याच्या चढाई साठी परत यायचंच होतं त्यामुळे आम्ही आमचं सर्व चढाईचे साहित्य सुळक्याच्या पायथ्याशी असलेल्या दगडाच्या नैसर्गिक ढोलीमध्येच ठेऊन दिले. ह्या वाटांवर कोणीच फिरकत नसल्यामुळे हे सहज शक्य होतं. परत वजन उचलून न्यायला व आणायला नको हा उद्देश. अश्या रीतीने एक अजिंक्य सुळका यशस्वीरीत्या चढून अविस्मरणीय मोहीम फत्ते करण्यात आली होती.
मोहिमेचे शिलेदार : मिलिंद पाठक, अभिजित दांडेकर, राजू डिंगणकर, अजय दीक्षित, श्रीधर बापट, विद्याधर काळे, विनय आठवले, किशोर आणि संजय गुप्ते.
त्यानंतर दोन आठवडयांनी, ७ जानेवारी १९८७ ला रात्री, आम्ही दुसरा सुळका M2 (५५० फूट) चढण्यासाठी परत आलो. म्हणजे आम्ही तिघंच (मिलिंद, मी आणि अजय) परत येणाऱ्यातले. आमच्याबरोबर आणखीन सरावलेले प्रतारारोहक जसेकी प्रदीप केळकर, अनिल चव्हाण, संतोष कल्याणपूर ह्यावेळी उपस्थित होते कारण हा सुळका जरा कठीण व वेळ काढणारा वाटत होता. ह्यावेळी आम्ही आमचा बेत मागील अनुभवानुसार थोडा बदलला. ८ जानेवारीला आम्ही ईगतपुरी - कुलंगवाडी मार्गे अलंगच्या भिंतीवरून प्रस्तरारोहण करून सरळ अलंगची गुहा गाठली व तिथेच त्या रात्री मुक्काम केला.
९ जानेवारीला सकाळी लवकर उठून अलंगवरून चढाईसाठी निघालो. बाकी सर्व राहायचे आणि खाण्याचे सामान आम्ही अलंगच्या गुहेमध्येच सोडले होते कारण परत रात्री तिथेच मुक्कामाला यायचे होते. हे सुद्धा सध्याच्या घडीला अद्भुत असेच वाटणारे आहे पण त्या काळी गडावर आम्ही सोडून कोणीच नसायचे.
तासाभरातच आम्ही सुळक्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. सर्व साहित्य मागच्या खेपेला आलो असताना एका दगडाच्या ढोलीमध्येच ठेवलेले होते, ते सर्व सुखरूप होते, ते बाहेर काढले. ह्यावेळी आमच्या बरोबर मिलिंद पाठक (मिल्या), प्रदीप केळकर (पद्या), अनिल चव्हाण (अन्या) असे कसलेले प्रस्तरारोहक असल्यामुळे, सुळका चढाईची धास्ती अजिबात नव्हती. मदन व M2 च्या मध्ये असलेल्या क्रॅक मधून चढाई करण्याचे सर्वानुमते ठरले, त्याप्रमाणे पद्यानी कलाईम्बिंगला सुरुवात केली. प्रथम कठीण श्रेणीचे प्रतारारोहण होते, व नंतर रूट एका मोठ्या चिमणी मध्ये शिरत होता. हि चिमणी चढून आम्हाला वरच्या कोल (खिंड) मध्ये जायचे होते. मी सेकंड मॅन असल्यामुळे पद्यानी मला वर बोलावून घेतले व वरची चढाई चालू केली. मोठं मोठे बोल्डर्स (दगडं) चिमणी ब्लॉक करत होते, त्यामुळे, सारखं सारखं चिमणीतून बाहेर येऊन चढाई करावी लागत होती त्यामुळे खूप वेळ जात होता. मधल्या एका कठीण पॅच वर मिल्यानी चढाई चालू केली व तो टप्पा पार करून आम्ही साधारण पणे दुपारी २ च्या सुमारास खिंडीत पोहोचलो. नंतर परत पद्यानी चढाई चालू केली. ५० फूट चढल्यानंतर तो एका लेज वर तो पोहोचला. तिथून आडवं जायचं असल्यामुळे, मी व अजय त्या लेजपाशी पोहोचलो, व पद्यानी पुढे चढाई चालू केली. वरती बोल्टींग चालू असल्यामूळे बराच वेळ आम्ही त्या लेज वर नुसते बसून होतो. जोक सांगून झाले, गाणी झाली, आठवणी झाल्या मग बारीक व मध्यम आकाराचे दगड आम्ही लेजवरून खाली ढकलून द्यायला सुरुवात केली, जेणेकरून आम्हाला पहुडायला थोडी जागा होईल 😊. हे करत असताना आम्ही आमच्या डोक्यावरील सेफ्टी हेल्मेट काढून बाजूला ठेवले होते 😎. मग थोडे पाय पसरण्याएव्हढी जागा झाल्यावर आम्ही आडवे झालो. थोड्या वेळानी पद्याचा वरून कॉल आला की रोप स्लॅक (सैल) ठेवा, म्हणून परत उठून बसलो. बाजूलाच ठेवलेले हेल्मेट खाली पडू नये म्हणून आम्ही ते परत अनावधानानेच डोक्यावर ठेवले आणि..... आणि वरून दगडांचा अक्षरश: पाऊस सुरु झाला व हेल्मेट वर कित्येक दगड आपटू लागले. भेदरायला लावणाराच प्रसंग होता तो. कसले “बाल बाल” बचावलो होतो आम्ही. त्या प्रसंगानंतर अलंग च्या गुहेत परत जाईपर्यंत मी व अजयनी हेल्मेट डोक्यावरून काढलेच नाही. सगळे पोट धरून हसत होते, पण असो, जो भोगतो त्यालाच समजतं 😔.
प्रस्तरारोहण संपवून ४५० फुटांवरच्या स्क्री मध्ये पोहोचल्यावर मी वर गेलो व पुढील चढाई चालू केली. ही चढाई फारशी कठीण नव्हती, व मी ती पुढील तासाभरातच पूर्ण करून संध्याकाळी ५ च्या सुमाराच ह्या ५५० फुटी अजिंक्य सुळक्याच्या माथ्यावर प्रथम पाऊल ठेवले. पाठोपाठ सर्वजण वर आले व आम्ही दोराच्या साहाय्याने खाली उतरून परत ७ वाजेपर्यंत सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचलो. आम्हाला सर्व windup करून मुक्कामाला अलंगच्या गुहेत जायचे होते, पण अलंगच्या रॉक पॅच वर रोप फिक्स असल्यामुळे आम्हाला चिंता नव्हती. आरामात टंगळ मंगळ करत आम्ही सर्वजण रात्री ८ वाजता अलंगच्या गुहेत पोचलो. ह्यावेळेस मात्र "बडा खाना" वगैरे करायची ताकद कोणातंच नव्हती, म्हणून ट्रेकर स्पेशल मुंग डाळीची पात्तळ खिचडी, कांडा व पापड असा फक्कड बेत केला. नंतर अजिंक्य सुळक्याच्या चढाईच्या यशाबद्दल मिल्यानी आणलेल्या गुलाबजामवर सगळ्यांनी ताव मारला व लगेच निद्राधीन झालो.
दुसऱ्या दिवशी (१० जानेवारीला) सकाळी अलंगवरून कुलंगवाडीमध्ये उतरण्यास सुरुवात केली. आम्हाला खूपच लांबचा पल्ला गाठायचा होता अजून आणि तेही आता सगळे वजन घेऊन. ३ तासात आम्ही कुलंगवाडीमध्ये पोचलो. कुलंगवाडीतील पोलीस पाटलांच्या घरी मस्त गरमा गरम नाचणीची भाकरी, कांदे बटाट्याचा रस्सा, भात व आमटी रेमटवून बाहुली मार्गे इगतपुरीकडे आम्ही मार्गक्रमण करणे सुरु केले (त्याकाळी गावातील पाहूणचार हा नीत्याचाच भाग होता) व रात्री कसारा मार्गे ठाण्यामध्ये पोचलो. त्यानंतर रात्री आमच्या बाणच्या चमूमधील विजय भालेरावच्या लग्नाच्या रीसेप्शनला सगळेजण चेंबुरला हजरही झालो.
अश्या रीतीने एका यशस्वी अजिंक्य सुळका चढाई मोहिमेची सांगता झाली. 🙏🙏
- अभिजित दांडेकर
No comments:
Post a Comment