Monday, February 8, 2021

सावर्णे व बेलपाड्याचे बिबटे - भाग २

२९ नोव्हेंबर १९८८, कोकणकड्यावरचा विजय दृष्टीपथात येत चालला होता. प्रोजेक्ट चालू होऊन आता जवळ जवळ २ महिने होऊन गेले होते. असंख्य वेळा चढाई काही ना काही कारणास्तव थांबवावी लागली होती. कधी माणसं, कधी पैसे तर कधी चढाई व खाण्याचे साहित्य. चढाईच्या अंतिम टप्प्यासाठी लागणारे काही रींग बोल्ट्स पुण्याहून येणार होते व किराणा माल कल्याणहून. तो घेऊन आम्हाला परत कोकणकड्याच्या बेस कॅम्पला पोहोचायचे होते. काही दिवसांपूर्वीच्या व्याघ्र अनुभवामुळे आम्ही चौघं जण, उगाच लफडं नको म्हणून, सावर्ण्यामध्ये अंधार व्हायच्या आतच पोहोचलो होतो. संध्याकाळची शेवटची बस येऊन गेली तरी आमचे सामान घेऊन येणारा काही त्यातून आला नव्हता. मोबाईल फोन वगैरे संदेशवहनाची काहीच साधनं त्या काळी उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला उद्या सकाळ पर्यंत तिथेच थांबण्यावाचून काहीच पर्याय नव्हता. अश्या प्रकारच्या प्रसंगातूनच प्रचंड सहनशक्ती निर्माण होत असावी. बेस कॅम्पला कळवायचीदेखील काही सोय नसल्यामुळे, त्यांचीही समजून घेण्याची क्षमता वाढत जात असावी एकंदरीत. असो. संध्याकाळचे ७.१५ वाजले होते. शेवटची कल्याण-सावर्णे बस आली होती. विठ्ठलने, सावर्ण्यामधील एकमेव रस्त्याला लागून असलेल्या टपरी वजा हॉटेलच्या मालकाने, आवरा-आवारी चालू करून हॉटेल बंद करायची तयारी चालू केली होती. त्यालाही त्याच बस ने परत मोरोशी गाठायचे होते. आम्हाला रात्र काढायची असल्यामुळे आम्हीही त्याच्याकडून खायचे पदार्थ घेऊन ठेवले होते. आमच्याकडे एकच टॉर्च असल्यामुळे, आम्ही विठ्ठलला विनंती केली की हॉटेलच्या बाहेरचा दिवा रात्रभर चालूच ठेवशील का? आमचा हॉटेलबाहेरील सारवलेल्या जमिनीवरच आज रात्री मुक्काम होता व आम्हाला हिंस्त्र जनावरापासून धोका असल्याचे त्याला वाटल्यामुळे त्यानेही लगेच आमच्या विनंतीला मान देऊन होकार दिला, अन् तो मोरोशीकडे मार्गस्थ झाला.

आम्हीही मग बराचवेळ इकडे तिकडे टंगळ-मंगळ केली, गप्पा मारल्या, आमच्याकडे असलेल्या तुटपुंज्या शिदोरीतून जेवलो. मग आता काय करायचे असा म्हणत असताना राजूने शक्कल लढवली की चला मस्त पैकी गाणी म्हणत बसूया. थंडीही बरीच पडली होती, म्हणून शेकोटीच्या तयारीला लागलो. सुक्या काठ्या व गवत गोळा करून स्टॅाक करून ठेवला. शेकोटी पेटवण्यास सुरुवात केली व त्यावरच चहा करायला ठेवला. मग लगेचच रफी, किशोर व तलत च्या रंगतदार गाण्यांनी जोर धरला, दगड्याचे आवडते "शुक्र तारा, मंद वारा" झालं, मन्याचं फेमस "वेग वेगळी फुले उमलली" पण झालं. त्यानंतर गरमा गरम चहा ढोसून झाला. मग उदय म्हणाला की मी जाऊन झोपतो, कारण मला प्रचंड झोप येतेय. मग तो टपरीबाहेरील अंगणात, दिव्याखाली पथारी पसरून झोपी जायच्या तयारीला लागला. आम्ही त्याच्या पासून अवघे १००-१५० मीटर लांब असू जास्तीत जास्त. आमच्या गझल्स आणि मराठी गाणी म्हणून संपल्यावर व घसा दमल्यावर आम्ही जुन्या केलेल्या चढाया व त्यातील मजेशीर अनुभव आठवून त्यावर गप्पा मारत बसलो होतो. आणि तेव्हढ्यात पाला पाचोळ्याच्या आवाजाने आमची नजर उदय झोपला होता त्या दिशेनी गेली, आणि परत पायाखालची जमीन सरकली व नव्याने फाटली. एक बिबट्या रस्ता ओलांडून सरळ टपरीच्या दिशेनी, म्हणजे उदय जिथे झोपला होता, त्या दिशेनी झपाट्याने येत होता. आम्ही आमच्यात म्हणालो की आपण शेकोटीतल्या पेटत्या काठ्या घेऊन एकाच वेळी आवाज करत जाउया त्या दिशेनी. असं म्हणे पर्यंत तो बिबट्या उदयच्या जवळ पोहोचला देखील. उदय एका कुशीला वळून झोपला होता. त्याच्या तोंडापाशी जाऊन तो बिबट्या त्याला हूंगू लागला, तसं उदयने हाताने त्याला अक्षरशः "हाड" असे करून ढकललं आणि कुस बदलून तो परत पांघरून डोक्यावर ओढून झोपी गेला. बिबट्याने सुद्धा “असा काय हा, घाबरतच नाही बाबा असा विचार करून त्याच्या पासून लांब जायला सुरुवात केली व पलीकडील झाडीत घुसला. आम्ही आरोळ्या ठोकत उदयपाशी पोहोचलो आणि त्याला उठवले. तेंव्हा तो आम्हाला विचातरो कसा, काय झाली का गाणी म्हणून? मग आम्ही त्याला विचारलं "की ते गाण्याचं जाउदे, तू आम्हाला एक सांग, की तू त्या बिबळ्याला चक्क ढकलून कसं काय दिलंस, तू घाबरला नाहीस का?" व झाला प्रकार त्याला सांगितला. तेव्हा उदय गर्भगळीत होऊन थरथर कापतंच त्याने विचारले "काय? तो बिबट्या होता? मला वाटलं कुत्रा हुंगतोय मला, म्हणून मी त्याला हाड केले व परत येऊन हूंगू नये म्हणून डोक्यावरून पांघरून घेऊन झोपलो". आम्हाला सगळ्यांना हसावे की रडावे तो समजेनासं झालं. आता ह्या बिबट्यांच्या सततच्या होणाऱ्या भेटींमुळे आमची तंतरलीच होती, व रात्रभर काही आम्हाला झोप लागली नाही हे वेगळं सांगायलाच नको.

दुसऱ्या दिवशी सकाळी विठ्ठलाला झाला प्रकार सांगितला व दिवा चालू ठेवल्याबद्दल त्याचे आभार मानले. आमचं आलेलं सामान घेऊन सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आम्ही बेलपाड्याकडे कूच केले. सगळेजण न बोलता गप्प बसून नुसते चालत होतो.

१ डिसेंबर १९८८,आम्ही चौघे जण आमच्या सुट्ट्या संपल्यामुळे परत मुंबई कडे निघालो होतो. आता कोकणकडा पुढच्या आठवड्यात सर होईल अशी आम्हाला आशा होती. सुट्ट्या संपल्यामुळे व कंपनीकडून धमकीवजा पत्र आल्यामुळे सगळ्याच चमूची पार पांगा पांग झाली होती. बेस कॅम्पला आता फक्त प्याऊ (सुहास पाठक) जो इतके दिवस समर्थपणे बेस कॅम्प व जेवण-खाण सांभाळत होता, स्व. मिलिंद पाठक, विश्वास थत्ते (लाटू), राजेश देशमुख (कष्ट्या), वरूण नामजोशी (मन्या) व स्व. उदय रेमजे एव्हढेच शिलेदार शिल्लक राहिले होते. नेहमीप्रमाणे बेलपाड्याहून खिंडीतून उतरायला आणि सावर्ण्यात पोहोचायला आम्हाला जरा उशिराच झाला होता व आमची शेवटची सावर्णे कल्याण बस चुकली होती. विठ्ठलही हॉटेल व "दिवे" बंद करून मोरोशीला निघून गेला होता. आता अंधारात तिथे रात्र काढायची म्हणून आमची परत नव्याने फाटली होती. ८ च्या सुमारास आमच्या नशिबाने एक रिकामा टेम्पो मुरबाडला चालला होता. आम्ही त्याला हात दाखवल्यावर त्याच्या ड्राइव्हरनेही गाडी थांबवली व माणशी २ रु. दराने आम्हाला मुरबाडला सोडायला तो तयार झाला. आम्ही क्षणाचाही विचार न करता आमचे सामान टेम्पोमध्ये टाकलं व आत उड्या मारल्या. सुटकेचा निश्वास टाकला होता आम्ही आणि एव्हढा आनंद झाला होता म्हणून सांगू, की सांगायची सोय नाही. मुरबाड ते ठाणे प्रवास कसा करायचा ही चिंता कोणालाच सतावत नव्हती ह्या क्षणी, सावर्ण्यातून सुटका झाल्याचा आनंदच जास्त होता.

थोडं अंतर गेलो आणि टेम्पो वाल्यानी गचकन टेम्पो थांबवला. आम्ही ड्रायव्हर व मागच्या भागात असलेल्या छोट्या खिडकीतून त्याला ओरडूनच विचारले “की काय झालं असा अचानक ब्रेक मारायला, सगळे आपटले इकडे तिकडे टेम्पोच्या मागील भागात. तेंव्हा तो घाबरतच म्हणाल की रस्त्यावर पट्टेवाला वाघ उभा आहे. आम्ही त्याला वेड्यातच काढले, व म्हणालो सह्याद्रीमध्ये फक्त बिबटेच आढळतात, पट्टेवाले वाघ नाही. आणि खरंच आमची अशी ठाम समजूत होती की वाघ आपल्याइथे कुठेच आढळत नाहीत, आहेत ते फक्त बिबळे. ड्रायव्हरने सांगितले तो रस्ता ओलांडून टेम्पोच्या मागच्या भागाकडे चालला आहे, म्हणून आम्ही टेम्पोच्या मागील भागातील शटर उचलून लोंबबकाळतच, पण टेम्पोच्या बाहेर न पडता, डोकावून लांब लांब अंधारात डोळे किलकिले करून वाघ दिसतोय का ह्याची शहानिशा करण्यात व्यस्त होतो. इतक्यात राजूचे लक्ष खाली गेले आणि तो ढाण्या वाघ टेम्पोच्या मागच्या दाराच्या खालीच, म्हणजे आमच्या पासून अवघ्या ४-५ फुटांवर आमच्याकडे बघत उभा होता. तो नुसता गुरगुरला जरी असता ना, तरी आमच्यापैकी एक दोघे जण घाबरून टपाटप खाली पडले असते, त्याच्या समोर. पण तो जंगलचा राजा होता, आमच्याकडे तुच्छतेने बघत, शेपटी हलवत शांतपणे चालत रस्त्याबाजूच्या जंगलात निघून गेला. त्यामुळे सह्याद्रीमध्ये पट्टेवाले वाघ नाहीत ह्या आमच्या समजाला कायमस्वरूपी तडा गेली होती, व कोकणकडा आपल्याला अजून काय काय दाखवणार आहे ह्या विचारात आम्ही गर्क असतानाच मुरबाड कधी आले हे आम्हाला समजलेच नाही.

कोकणकडा व बाणच्या चढाई दरम्यान बिबळ्या व वाघांबरोबर इतके वेळा नजरानजर झाली, पण ह्या हिंस्त्र (??) प्राण्यांनी आम्हाला कधीही इजा केली नाही, कारण....कारण एकच असावं, आम्ही त्यांचे खाद्य नाही, व विनाकारण हल्ला करून मारणे हे त्यांचे पिंड नाही. काही आठवड्यांपूर्वी, एक रानगवा चुकून शहरात आला, आणि माणसाने काही कारण नसताना त्याचा बळी घेतला. आता हिंस्त्र प्राणी कोण हे तुम्हीच ठरवा. आमचं नशीब की असा विचार करणारे प्राणी आम्हाला जंगलात भेटले नाहीत, नाहीतर हे लिहायला आज हयात नसतो कदाचित....!!

- अभिजित दांडेकर



1 comment: