Monday, February 8, 2021

कळकराय सुळका चढाई मोहीम व अपघात १९८७

ह्या मोहिमेचा महिना कुठला तो आठवत नाही पण पौर्णिमा होती त्या रात्री एव्हढं नक्की. हॉलिडे हायकर्स क्लबची ढाक बहिरी ट्रेक होती. छत्रपती पुरस्कार विजेता व नामवंत गिर्यारोहक प्रजापती बोधणे (प्रजा) मोहिमेचा नेता होता. आम्ही सर्वजण शनिवार दुपारच्या कर्जत लोकलने कर्जतला उतरून पायथ्याच्या वधप गावात एस. टी. बसने पोहोचलो. सामानाची बांधाबांध झाल्यानंतर सर्वांनी चालायला सुरुवात केली. मोहिमेच्या आखणीनुसार आम्ही सर्वजण ढाकच्या खालच्या विस्तीर्ण पठारावर रात्रीचा मुक्काम करणार होतो व दुसऱ्या दिवशी सकाळी ढाकच्या गुहेत जाऊन आल्यानंतर परत कर्जतमार्गे मुंबई गाठणार होतो. ह्यात ढाक शेजारच्या कळकराय सुळक्यावर चढण्याचं वगैरे काहीच ठरलेले नव्हते. मस्त पौर्णिमेचा चंद्रप्रकाश पडला होता आणि त्यामुळे आम्ही कोणीच टॉर्च लावायच्या भानगडीत पडलोच नव्हतो व झपाझप पावले टाकीत तासा दीड तासातच आम्ही पठारावर येऊन पोहोचलो. बाकी सर्वजण येईपर्यंत दोन अडीच तास गेले. एक छानशी सपाट जागा आम्ही मुक्कामासाठी निवडली व रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागलो. गरमागरम आंबेमोहोर भात, फोडणीचे वरण व कांदा-बटाटा-टोमॅटोचा रस्सा असा झकास कार्यक्रम होता. मनसोक्त जेवणावर ताव मारून आम्ही आडवे पडायच्या तयारीला लागलो.

 

ह्या सुमारास, म्हणजे १९८६-१९९० चा काळ, आम्ही प्रस्तरारोहणाच्या अधीन झालो होतो.  बाण, एम १, एम २, मार्जोरी नूक (माथेरान) हे अजिंक्य सुळके तसेच लिंगाणा, भवानी कडा, कर्नाळा, माहुलीचा नवरा व नवऱ्याची करवली, पदरगडचे सुळके, मुंब्रादेवी भिंत अश्या बऱ्याच चढायांची शिदोरी आमच्या पाठीशी होती. त्यामुळे नाही म्हटलं तरी आमच्यात थोडी खुमखुमी  होतीच. रात्री जेवण झाल्यावर मी, प्रदीप म्हसकर (म्हश्या) व  धनंजय कुंटे बोलता बोलता म्हणालो की उद्या आपण पटापट पुढे जाऊन कळकराय सुळका चढूयात का? तोपर्यंत बाकी सगळे लोक ढाकच्या गुहेत दोर लावतील व चढायला सुरुवात करतील. आपण सगळ्यात शेवटी जाऊन रोप काढून येऊ व सर्वांबरोबर परत निघूया कर्जतला जायला. खिंडीतून तशी चढाई सोपी असल्याचे आम्ही ऐकले होते त्यामुळे प्रजाला विचारून त्याची अनुज्ञा घेण्याचे ठरले. प्रजानेही किती जण जाणार व किती दोर बरोबर नेणार ह्याची खातरजमा करून जाण्यास संमती दर्शवली. त्यानुसार आम्ही तिचे जण जायचे ठरले व त्यासाठी लागणारे चढाईचे सामान म्हणजे २०० फुटी दोर, काही खिळे, स्नॅपलिंक्स (अल्लुमिनियमच्या कड्या), फिगर ऑफ ऐट डिसेंडर (दोराच्या साहाय्याने खाली उतरायचे साधन) व सीट हार्नेस आमच्या सॅकमध्ये आम्ही रात्रीच काढून ठेवले जेणेकरून उद्या सकाळी वेळ जायला नको.

 

सकाळी लवकर उठून, चहा नास्ता करून सगळ्याची आवरा आवारी चालू असेपर्यंत आम्ही ढाक व कळकराय सुळक्याच्या मध्ये असलेल्या खिंडी कडे प्रयाण केले. तासाभरातच आम्ही तिथे पोहोचलो व समजले की दुसऱ्या एका ग्रुपची तिथे चढाई सकाळपासूनच चालू आहे. म्हणजे ह्यामध्ये जयंत डोफे व पुण्याच्या ससून हॉस्पिटलचे २ ऑर्थोपेडिक डॉक्टर्स एव्हढेच जण होते. त्यांनी त्या मार्गातील थोड्याश्या कठीण असणाऱ्या कातळटप्प्यावर दोर लावलेलाच होता. मग आमचे काम आणखीनच सोपं झालं. आम्ही बिले (दोरीचा शरीराला बांधून दिलेला सपोर्ट) घेऊन अर्ध्या तासातच सुळक्याचा माथा गाठला. धनंजयनी कॅमेरा काढून छायाचित्रे घेण्यास सुरुवात केली. माथ्यावर ५-१० मिनिटे थांबून निसर्गरम्य देखावा बघून झाल्यानंतर आम्ही उतरायला सुरुवात केली. माथ्यावर पेग (जमिनीत मारायचा एक लांबलचक खिळा) मारून आम्ही त्याला दोर लावला व सरळ खिंडीपर्यंत सोडला. म्हश्यानी रॅपलिंगला (दोराच्या साहाय्याने उतरणे) सुरुवात केली. सुळक्याच्या भिंतीला परपेंडीकुलर पोसिशन घेतली, दोन पायात अंतर ठेवले, ब्रेकिंग हॅन्ड मागे ठेवला व तो निघाला. त्याने एक पाय उचलला मात्र, आणि त्याचा तोल गेला व ज्याला आम्ही पेन्डूलम म्हणतो त्या प्रमाणे तो त्याच्या डावीकडे अनियंत्रित जाऊ लागला. त्याने पेन्डूलम थांबवण्यासाठी दावा पाय सुळक्याच्या भीतीवर दाबण्याचा प्रयत्न केला, त्या धडपडीत तो एका दगडाच्या भेगेत अडकला पण शरीराचा वेग न थांबल्यामुळे पाय टाचेपाशी दुमडला गेला. पायातून कडाड कट्ट असा आवाज आला.  पाय दगडातील भेगेत अडकल्यामुळे, म्हश्याचा डावा हात सुळक्याच्या प्रस्तरावर आपटला व परत कडाड कट्ट..!!! म्हश्याला जागेवरून हलताही येत नव्हते व वेदनेने तो ग्रासला होता. ताबडतोब मी त्याच्यापाशी जाऊन बिले दोर अडकवला व त्याला परत सुळक्याच्या माथ्यावर खेचून घेण्यात आम्हाला यश आले.

 

दोनपैकी एक ऑर्थोपेडिक डॉक्टर माथ्यावरचा असल्यामुळे म्हश्याचा डावा पाय व डावा हात दोन्ही तुटल्याचे (फ्रॅक्चर झाल्याचे) निदान करण्यात आले (नंतर ससून मध्ये क्ष-किरण चाचणी घेतली असता समजले की हातापायात मिळून एकंदरीत ६ ठिकाणी हाड मोडले होते). आता ह्या अवस्थेत म्हश्याला सुळक्याच्या माथ्यावरून, खाली खिंडी पर्यंत आणि पुढे वधप किंवा कुंडेश्वर इथे कसे नेता येईल ह्याचा आम्ही विचार करू लागलो. प्रजाला निरोप पाठवून झालेला वृत्तांत कळवला. तोही ढाकच्या गुहेतील चढाईची सूत्र दुसऱ्याकडे सोपवून लगेचच कळकराय सुळक्याच्या माथ्यावर पोहोचला. ह्या नंतर आम्ही जे बघितले ते एव्हढे अचाट होते की अजूनही आठवले की कळतं की ताकद, टेक्निक व अनुभव ह्या तिन्ही गोष्टी प्रस्तरारोहणकरता आणि एखादा अपघात झाला असता रेस्क्यू करण्यासाठी किती महत्वाचे आहेत. पाठुंगळीला एखाद्या माणसाला घेऊन लॉन्ग स्लिंग रॅपलिंग करणं हे दिसतं तेव्हढं सोपं नसतंच पण खरं सांगायचं झालं तर धोकादायकही असतं. त्यामुळे प्रजाने त्याला पाठुंगळीला घेतले, दोघांच्या सीट हार्नेस लॉक केल्या, बिले दोर लावला आणि चक्क त्याने त्या सुळक्याच्या माथ्यावरून म्हश्याला घेऊन "स्टमक रॅपलिंग" करायला सुरुवात केली. ज्यांना कोणाला स्टमक रॅपलिंग कसे करतात हे माहित नसेल तर ह्या प्रकारात दोराच्या साहाय्याने खाली उतरताना आपले तोंड व छाती हि खालच्या दिशेने असते व पाठ माथ्याकडे. बघणाऱ्या माणसाला हे दृश्य भयावहच असते. त्याला खिंडीत सुखरूप उतरवले व ह्याचे संपूर्ण श्रेय प्रजाला जाते. तो नसता तर आम्हाला हे कर्मकठीण झाले असते, एव्हढं नक्की. नंतर म्हश्याला प्रथोमोपचार चालू झाले या काठ्या, दोऱ्या बांधून तात्पुरता आधार देण्याचे काम त्या २ डॉक्टर्सनी चालू केले. तोपर्यंत आम्ही ढाकच्या गुहेत जाऊन आलो व तेथील लोकांना सुखरूप खाली आणून, तेथील दोर काढून परत खिंडीत पोहोचलो.  मग आम्ही ठरवले की म्हश्याला पाटीवर उचलून अळी पाळीने न्यावे लागणार आहे आणि त्यासाठी वधपला नं जात जरासा सोपा रस्ता असलेल्या कुंडेश्वर इथे नेण्याचे ठरले. कुंदेवारहून बसनी कामशेत व पुढे पुणे असं नेता येणं सोपेही पडेल या जलद उपचारही सुरु होऊ शकतील. त्यावेळी मला स्वतःचे वजन कमी असले कि कितीही फायदा होतो ह्याचा साक्षात्कार घडला. म्हश्या फक्त ४० किलोचा असल्यामुळे त्याला पाठीवर टाकून उचलून आणणे आम्हा सर्वाना शक्य झाले. माझ्यासारखा ७० किलोचा असता तर तिथेच टाकून यावे लागले असते.

 

संध्याकाळी आम्ही मजल दरमजल करत कुंडेश्वरला येऊन पोहोचलो. सर्व जण दमून गेले होते. पाठीवर उचलून आणणे जेव्हढे कठीण व त्रासदायक असते ना त्याही पेक्षा कित्येक पटीने त्रासदायक त्या अवस्थेत लाचार होऊन पाठीवर बसणे असते, तेही हातापायात फ्रॅक्चर असताना. जयंत डोफे, सासूचे ते दोन डॉक्टर्स (नावं आठवत नाहीत त्यांची आता), प्रजा व इतर सदस्यांनी पुढाकार घेऊन व आपणहून मदत करून हे शक्य केलं होतं. जो कोणी म्हश्याला उचलत होता, त्याची सॅक दुसऱ्या कोणालातरी उचलावी लागत होती हे विसरून चालणार नाही. गावात मुक्कामाची बस येऊन थांबली होती. आम्ही मेडिकल इमर्जन्सी आहे असं सांगितल्यावर, एस. टी. च्या चालक व वाहकाने, स्वतःच्या जबाबदारीवर बस पुन्हा कामशेतला नेली जेणेकरून वैद्यकीय मदत लवकरात लवकर मिळावी. धन्य ते एस. टी.महामंडळ व त्याचे जबादार वाहक चालक. त्या दोघांनाही सलाम.

 

खालील फोटो हा अपघात व्हायच्या काही मिनिटं आधी कळकराय सुळक्याच्या माथ्यावर धनंजय कुंटे नी काढला आहे. मागे उभे (डावीकडून) जयंत डोफे व अभिजित दांडेकर. खाली बसलेले (डावीकडून)  प्रदीप म्हसकर (म्हश्या) व ससून हॉस्पिटल मधील ऑर्थोपेडिक डॉक्टर. जयंत डोफेची व आमची ओळख ह्याच सुळक्यावर झाली.

- अभिजित दांडेकर



No comments:

Post a Comment