१९८८ चा काळ, आमच्या चमूची हरिश्चंद्रगडाच्या महाकाय कोकणकड्यावर अतिशय कठीण व चढाईस अशक्य वाटणाऱ्या सेंटर रूट वर चढाई मोहीम चालू होती. अपुऱ्या मनुष्यबळामुळे काहीही सामानाची गरज भासल्यास चढाई मोहीम सदस्यांना चढाई थांबवून परत मुंबई पुणे गाठावे लागत असे. मग ते खाण्याचे सामान असो किंवा चढाईस लागणारे असो. मोबाईल फोन त्याकाळी नव्हता हे वेगळं सांगायची गरज नाही. बेलपाडा (सध्याचे नाव वाळीवरे) हे आमचे पायथ्याचे गाव. तिथे पूर्वी गाडी जात नसे. माळशेज घाटाच्या रस्त्यावरील, घाट जिथे चालू होतो तिथले गाव "सावर्णे ". बस ईथे थांबायची आणि मग आम्हाला चालत प्रवास चालू करावा लागत असे. रात्रीच्या वेळी माळशेज घाटातून वाहतूक पूर्णतः बंद असायची. सावर्ण्याहून निघालो की काळू नदीच्या काठा काठाने पायवाट जात असे, त्यावर एके ठिकाणी फक्त चालत जाणाऱ्यांसाठी नदीवर छोटासा पूल बांधला होता आणि तो ओलांडला की चढाई चालू होत असे. सावर्णे व बेलपाड्याच्या मध्ये एक छोटी डोंगररांग आहे, ती ओलांडावी लागत असे. आम्ही सामान घेऊन सावर्ण्याहून निघालो की तडक ह्या डोंगरातील खिंडीमध्ये चढून येऊन विश्रांतीसाठी थोडावेळ थांबत असू.
१९
नोव्हेंबर १९८८. मी आणि विश्वास थत्ते दुपारी ठाण्याहून किराणा सामान, चढाईचे काही
साहित्य घेऊन निघालो. कल्याणहून सावर्णे बस पकडून संध्याकाळी ७-७.३० च्या सुमारास सावर्ण्यामध्ये
पोहोचलो. तेंव्हा तिथे एकच टपरी वजा हॉटेल होते. विठ्ठल, त्याचा मालक, बस येईपर्यंत
थांबायचा व बसमधून उतरलेल्या लोकांचे चहा पाणी झाले की हॉटेल बंद करून त्याच बसनी मोरोशीला
त्याच्या घरी निघून जायचा. त्या दिवशी आम्हीही चहा बिस्किटं खाल्ली व रात्री बेलपाड्याकडे
प्रयाण सुरु केले. मस्त चंद्र प्रकाश पडला होता त्यामुळे टॉर्च लावायची गरजच भासलेली
नव्हती. काळू नदीवरील ब्रिज ओलांडताना आमचं लक्ष सहज खाली गेलं आणि अंगावर शहारा आला.
जोरात चालावं, दबकत जावं कि थांबून राहावं काहीच सुचत नव्हतं. खालती पाण्यापाशी एक
बिबट्या शांत पणे बसला होता. आम्ही दबक्या पावलांनी हळू हळू पुढे सरकत होतो तोच बिबट्याने
आळस दिला व रुबाबात उभा राहिला. आमच्याकडे बघून न बघितल्यासारखे केलं व बाजूच्या जंगलात
उडी मारून गायब झाला. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला व पुढे निघालो. झाल्या प्रसंगामुळे,
आमच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता व लक्ष चारी बाजूला भिरभिरत होतं, कोणी आस पास
वावरतंय का ह्याची चाहूल घेत होतं.
साधारणपणे
तासाभरात आम्ही खिंडीमध्ये पोचलो. आता जरा बरं वाटत होतं. आम्ही खांद्यावरील सामान
खाली ठेऊन निवांतपणे एका दगडावर पाठ टेकून पाणी पीत बसलो. वर आकाशात सुंदर चांदणं पडलं
होते, चंद्र आता अस्तास चालला होता. आम्ही दोघेही नकळतच पहुडलो व माहिती असलेल्या तारका
समूहांना शोधू लागलो. व्याध व मृग नक्षत्र हे पटकन सापडणारे समूह, त्यावरून उत्तर दिशा
लगेच ओळखता येते. मग कृतिका, रोहिणी, हस्त नक्षत्र ओळखुन झाली. नजर थोडीशी खालती आली
व विश्वास म्हणाला, अरे देवयानी बघ....काय दिसतेय...वा !! मीही क्षणभर दचकलोच, की ही
देवयानी कोण व ईथे काय करतेय रात्रीची डोंगरात? मग समजलं की ही भुतलावरची देवयानी नसून
आवकाशस्थित देवयानी आहे. त्या माझ्या “आ” वासलेल्या अवस्थेतच आमचं लक्ष आणखीन
खाली गेलं, खिंडीतल्या डोंगराच्या काळ्या पार्श्वभूमीवर दोन तारे लकाकत होते. विचित्ररीत्या
दिसणाऱ्या त्या ताऱ्यांकडे बघत आम्ही संभ्रमात पडलो होतो की हे कुठले तारे असावेत?
तेव्हढ्यात ते दोन तारे हलले आणि पुढच्याच क्षणाला आम्ही स्तब्ध झालो. कारण ते दोन
तारे नसून आणखीन एका बिबट्याचे चमकणारे व आमच्या दिशेनी रोखलेले डोळे होते हे आम्हाला
कळून चुकलं होतं. परत एकदा नव्याने तंतरली आमची. साधारणपणे १०० मीटर वरच्या बाजूला
एका दगडावर तो विसावला होता. आम्ही क्षणार्धात कृतिका, रोहिणी, देवयानी वगैरे सर्व
काही विसरलो, व इथेच थांबायचे कि गावाकडे निघायचे ह्या गहन प्रश्नात रममाण झालो. ५-१०
मिनिटं अशीच आमची निष्काळजी चळवळ चालू होती व काय करावे ते सुचत नव्हतं. तो बिबट्याही
शांतपणे बसून आमच्याकडे बघत बसला होता व हलायचं नाव काढत नव्हता. तेव्हढ्यात आमच्या
नशिबाने बेलपाड्याकडून ३-४ गाववाले जोर जोरात गप्पा मारत व हातातील काठ्या जमिनीवर
आपटत खिंडीकडे येताना आम्हाला दिसले. ते येईपर्यंत इथेच थांबावे असं आम्ही ठरवलं व
परत स्तब्ध होऊन तिथेच बसलो. बिबट्यालाही त्यांची चाहूल लागली असावी कदाचित, कारण इतका
वेळ आरामात बसलेला तो अचानकपणे उठून, आमच्याकडे एक खणखणीत कटाक्ष टाकून, डोंगर उतारावर
नाहीसा झाला. जणू काही त्याला म्हणायचं होतं “बघतो तुम्हाला पुढच्या वेळेस”. थोड्याच वेळात ते गाववाले
आमच्या पर्यंत पोहोचले, आम्ही “राम राम” वगैरे करून, व बाकी काहीच न बोलता भयावह
वेगाने तडक गावाकडे कूच केले. तासाभराच्या अंतराने दोन बिबट्यांचे झालेले दर्शन, ह्यामूळे
आम्ही पुरते हबकून गेलो होतो, व परत एकदा तोंडातून चवाक्षरही नं काढता झपाझप पावले
टाकत बेलपाडा गाठले. नेहमी प्रमाणे पोलीस पाटलांच्या घराबाहेर ओसरीवर नं झोपता, सरळ
दार लावून घराच्या आतमध्येच झोपणे आम्ही पसंत केले 😊.....नं जाणो ईजा, बीज्या
झाला... आता तिज्या नको 🤪
- अभिजित दांडेकर
Great 👍
ReplyDeleteTerrible experience. 2 leopards in span of 1 hr.
Deleteनशीबवान आहात. बिबट्यांनी काही हल्ला केला नाही.
ReplyDeleteThanks
DeleteMast ho Abhijeet 👍🏼👍🏼
ReplyDeleteThank you
Deleteछान, सुंदर, प्रत्यक्ष तिथे असल्याच्या भास झाला
ReplyDeleteThanks
Deleteअभिजित सर एक थरारक अनुभव आणी छान शब्दांकन
ReplyDeleteThank you
Deleteछान उत्कांठावर्धक वर्णन ...
ReplyDelete