Monday, February 8, 2021

काट्याची लिंगी - अजिंक्य सुळका चढाई मोहीम (२१-२२ नोव्हेंबर १९८७)

१९८७ च्या पावसाळ्यात नाणेघाटात फिरताना व थंड गार वाऱ्याचा आस्वाद घेत बसलेलो असताना, अचानक ढगांची चादर बाजूला झाली व आम्हाला नाणेघाटाच्या पठाराच्या खालच्या बाजूला असलेल्या "काट्याच्या लिंगी" चे दर्शन घडले. थोडी चवकशी केली तेंव्हा कळले की हा सुळका अजिंक्य आहे....झाले, लगेच क्लाइम्बिंगला हाती घ्यायला पाहिजे असे म्हणून आखणीला सुरुवात झाली. माथेरानचे मार्जोरी नूक व ढाकचा कळकराय ह्या मोहिमा पावसाळ्यानंतर लगेचच असल्यामुळे काट्याच्या लिंगीची आगाऊ पाहणी करायला वेळच मिळाला नाही. शेवटी नोव्हेंबर उजाडला.

सुळक्याला डायरेक्ट भिडायचे ठरले व त्याप्रमाणे मी, प्रदीप केळकर, राजू डिंगणकर, राजू देशमुख, अभय पावगी जमेल ते साहित्य करून वैशाखरे गावाकडे निघालो. २१ नोव्हेंबरला दुपारी ट्रेननी कल्याण गाठले. तिथून दुपारच्या सावर्णे बसनी निघालो. सरळगावला बस नेहमीप्रमाणे थांबली, तिथली मिसळ पाव खूप प्रसिद्ध होती त्या काळी. अचानक निघाल्यामुळे आमच्याजवळ खायला काहीच नव्हते (म्हणजे असं नुसतं लिहायचं असतं, खायला बरोबर कधीच काही नसायचं) त्यामुळे आम्ही कल्याणहून घेतलेला फ्रुट ब्रेड व ८-१० संत्री क्लाईम्बकरता साठवून ठेवत मिसळीवर ताव मारला, नं जाणे उद्या रात्री पर्यंत खायला मिळेल कि नाही. संध्याकाळी ७ च्या सुमारास वैशाखरे गावात उतरलो. सुळक्याची फक्त दिशा माहित होती, दिसत नव्हताच, त्यामुळे गावात चवकशी केली असता पायथ्याशी काट्याची वाडी नावाचे गाव असल्याचे कळले व आम्ही त्या दिशेनी कूच केले. रस्ता असा नव्हताच (परत "आपण रस्ता चुकलो" की असं लिहायचं असतं) त्यामुळे आम्ही अंदाजानेच रात्री ११ पर्यंत भरकटत होतो. शेवटी कंटाळून आम्ही तेथेच माळरानावर झोपण्याचा निर्णय घेतला व पहाटे उठून निघूया असे सर्वानुमते ठरले. पहाटे उठल्यावर गावातल्या गुरांचा आवाज ऐकल्यावर कळले कि आम्ही गावापासून पाच दहा मिनिटाच्या अंतरावरच झोपलो होतो. म्हणजे आपण बरोबर दिशेनी निघालो होतो तर, छान.  प्रातःर्विधी उरकून गावाकडे निघालो, आता काट्याची लिंगी सुळका आम्हाला दिसत होता, त्यामुळे अर्धी चिंता मिटली होती. तरीही रस्ता शोधण्यात अजून वेळ जायला नको म्हणून आम्ही एका गाववाल्याला येतोस का म्हणून विचारले असता, खायला मिळेल ह्या आशेवर तो तयार झाला (??!!). गावातून निघाल्यावर डोंगराची एक उभी धार सुळक्याच्या पायथ्यापर्यंत जाते. त्यावर वाळलेले गवत व खूप स्क्री होती. आम्ही सर्वजण  घसरत,आपटत १० वाजेपर्यंत एकदाचे बेसला पोहोचलो.

नाणेघाटाच्या पठाराचा डोंगर व लिंगी ह्यामधील खिंडीमध्ये चढाई करून रोप लावले व आम्ही सर्वांनी सामान खिंडीत आणून ठेवले. खिंडीतून क्लाइम्बला सुरुवात झाली, प्रदीप लीड करत होता, त्याने  पहिला ५० फुटांचा टप्पा फ्री मारून एक पेग टाकला.  नंतर चढाई थोडी उजवीकडे ट्रॅव्हर्स घेऊन करावी असं ठरलं. १५ फूट उजवीकडे थोडंसं तिरकं गेल्यावर चढाईचा मार्ग निश्चित केला, व चढाई पुढे चालू झाली. मधे मधे ३-४ पिटॉन्स मारून व बराचसा पॅच फ्री चढून १.३० वाजता आम्ही सगळे समिटला पोहोचलो. आणि हा २०० फुटी अजिंक्य सुळका सर केला.  दुर्दैवाने आमच्याकडे कॅमेरा नसल्यामुळे, एकही फोटो काढू शकलो नाही.

आता खरा गमतीचा भाग सुरु... ! मधल्या एका लेजवरून तिरकं खाली उतरून परत तिरकं खिंडीत येण्यापेक्षा सरळ खिंडीत उतरायचे ठरले. त्याप्रमाणे रिंग बोल्ट मारायची तयारी सुरु झाली. पद्यानी शांतपणे दगडामध्ये ड्रिल बिटनी हॅमर करायला सुरुवात केली. प्रशस्त लेजवर उभं असल्यामुळे, वेडं वाकडं उभं राहून तिरपगड्या अवस्थेत बोल्ट मारायचा नाही हा अनुभव खरंच सुखावणारा होता. एक शालजोडीतला गोंडस बोल्ट घेऊन व तशीच सुंदर साजेशी वेज त्याला लावून, बोल्टला त्या कातळात ठोकण्यात आले. त्याला रोप फिक्स करून खालच्या खिंडीत सोडला. आम्ही पाचही जण त्या बोल्टला अँकर होतो. राजू देशमुख नी रॅपल करायला सुरुवात केली, इटालियन हीच लावून तो ३-४ फूट लेजपासून खाली आला आणि त्याची नजर बोल्टकडे गेली, व तो म्हणाला पद्या, बोल्ट हलतोय. आम्ही सगळ्यांनी त्याला वेड्यात काढले व खाली उतरण्यास सांगितले. आणखीन २ फूट गेल्यावर त्याचा परत तोच आक्रोश...!!! शेवटी प्रदीप वैतागून म्हणाला की वर ये परत, स्वतःच्या हातानी चेक कर आणि मग रॅपलिंग ला सुरुवात कर. त्याप्रमाणे, क्षणाचाही विलंब न करता राजू वर आला. तो लेजवर पोहोचल्यावर प्रदीप त्याला बोल्ट खेचून दाखवू लागला, व म्हणत होता, अरे असा बोल्ट कधी हलतो का रे? असं म्हणत असे पर्यंत, तो गोंडस बोल्ट त्या सुंदर वेज सकट हातात आला. त्याक्षणी, एकदम ३-४ स्नॅपलिंकचे आवाज आले, सर्वांनी आपल्याल्या सेल्फ अँकर मधून डिस्कनेक्ट केल्याचा आवाज होता तो. त्या  दिवशी आम्हा पाचही जणांची "कटी पतंग" झाली असती पण राजूच्या सावधानतेमुळे अनर्थ टळला. खिंडीत बसलेल्या गाववाल्याला ह्याची काहीच कल्पना नव्हती, तो आपला सगळे खाली येऊन आपल्याला खायला कधी मिळेल ह्याच प्रतिष्ठेत होता. शेवटी, दुसरी चांगली वेज त्याच बोल्टमध्ये  टाकून,बोल्ट परत नीट मारण्यात आला, ४-५ वेळा चेक करून सर्वजण सुखरूप रीत्या खाली आले. सामान आवरून, फ्रुट ब्रेड व संत्री यांचं जेवण  करून (गाववाल्यानी कपाळाला हात मारला असणार, निश्चितच), आम्ही खाली उतरायला ५ वाजता सुरुवात केली. परत त्या भयावह स्क्री वरून घसरत, पडत व पडल्यावर एकमेकांना हसत (हा आमचा आवडीचा उद्योग, एकमेकांना पडल्यावर जोर जोरात हसणे) कसे बसे काट्याच्या वाडीत पोहोचलो. रात्री चालत वैशाखरे गाठले पण तोपर्यंत शेवटची बस निघून गेली होती (त्या काळी माळशेज घाटातून रात्रीची वाहतूक बंद असे), त्यामुळे रस्त्यावरच पथाऱ्या पसरल्या. योगा योगाने  एक मारुती जिप्सी  आली व त्यात दोनच माणसे होती, त्यांनी आम्हाला कल्याण पर्यंत लिफ्ट दिली व आम्ही मध्यरात्री ठाण्यात परत सुखरुप आलो.

- अभिजित दांडेकर



2 comments:

  1. This is very good decision to write your experiences in blog form.There are very little blogs about climbing! You represent an era of climbing activities in Sahyadri! Waiting for series!👍👍

    ReplyDelete